Women’s T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज उपांत्य फेरीच्या जवळ, बांगलादेशवर 8 विकेट्सने मिळवला विजय….

Women’s T20 World Cup 2024 (BAN vs WI) : वेस्ट इंडिज महिला संघानं टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. गुरुवारी (10 ऑक्टोबर) शारजाह क्रिकेट मैदानावर हेली मॅथ्यूजच्या नेतृत्वाखालील संघाने निगार सुलतानाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह, 2016 चा चॅम्पियन संघ चार गुण आणि +1.708 च्या निव्वळ रनरेटसह गट-ब च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेची चार गुण आणि +1.527 च्या निव्वळ धावगतीसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. आफ्रिकेनं तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. बांगलादेशचा विचार करता, उपांत्य फेरीत जाण्याची आशा बाळगण्यासाठी त्यांना त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल.
West Indies cruise to victory against Bangladesh in Sharjah 💪#T20WorldCup | #WhateverItTakes | 📝 #BANvWI: https://t.co/ByN2Gwt8fI pic.twitter.com/FsFkids0A9
— T20 World Cup (@T20WorldCup) October 10, 2024
बांगलादेश 103 धावांवर गारद…
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर बांगलादेशला आठ बाद 103 धावा करता आल्या. मागील दोन सामन्यांप्रमाणे या सामन्यातही बांगलादेशच्या फलंदाजांना धावा करता आल्या नाहीत. कर्णधार निगार सुलतानाने 44 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 39 धावा केल्या. सुलतानाने या सामन्यात महिला टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील 2000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती पहिली बांगलादेशी फलंदाज ठरली. याव्यतिरिक्त दिलारा अख्तरने 19 धावांचे, शोभना मोस्तारीनं 16 धावांचे तर रितू मोनीनं 10 धावांचे योगदान दिले.
वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत करिश्मा रामहारिकने 4 षटकात 17 धावा देत 4 बळी घेतले. करिश्माशिवाय वेस्ट इंडिजकडून ॲफी फ्लेचरने 4 षटकात 25 धावांत 2 बळी घेतले. कर्णधार हेली मॅथ्यूजला एक विकेट मिळाली.
वेस्ट इंडिजने 43 चेंडू शिल्लक असतानाच जिंकला सामना…
विजयासाठीचे 104 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने 43 चेंडू शिल्लक असतानाच गाठले. स्टॅफनी टेलर आणि हेली मॅथ्यूजने पहिल्या विकेटसाठी 7.3 षटकांत 52 धावांची भागीदारी करून विजयाचा पाया रचला. टेलरने 29 चेंडूत 27 धावा केल्या आणि महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात 1000 धावा करणारी न्यूझीलंडच्या सुझी बेट्सनंतरची दुसरी फलंदाज ठरली. मात्र, टेलर पुढे खेळू शकली नाही आणि दुखापतीमुळे तिला निवृत्ती घ्यावी लागली.
मॅथ्यूजने दुसऱ्या टोकाला फटकेबाजी करताना 22 चेंडूत 34 धावा केल्या. मारुफा अख्तरने तिची विकेट घेतली. त्यानंतर शमन कॅम्पबेलने 16 चेंडूत 21 धावांची खेळी केली. त्यानंतर अखेर डायंड्रा डॉटिनने सात चेंडूंत दोन षटकार आणि एक चौकारासह नाबाद 19 धावा केल्या. डायंड्राने 13व्या षटकात दोन उत्तुंग षटकार मारत वेस्ट इंडिजला लक्ष्यापर्यंत नेले. बांगलादेशकडून गोलंदाजीत मारुफा अख्तर आणि नहीदा अख्तर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





