WI vs BAN : वेस्टइंडिजचा दहा वर्षांचा दुष्काळ अखेर संपला..! बांगलादेशविरूध्द सलग दुसरा ODI सामना जिंकत केला मोठा कारनामा….

West Indies vs Bangladesh 2nd ODI Match Result | वेगवान गोलंदाज जेडेन सील्सच्या चार विकेट्स आणि सलामीवीर ब्रँडन किंगच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या वनडेमध्ये बांगलादेशचा 79 चेंडू अन् सात गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. वेस्ट इंडिजने प्रथम बांगलादेशचा डाव 46 षटकांत 227 धावांत गुंडाळला आणि त्यानंतर 36.5 षटकांत तीन गडी गमावून 230 धावा करून सहज विजय नोंदवला. 9 षटकात 22 धावा देत 4 विकेट घेणारा जेडेन सील्स हा सामनावीर ठरला.
A 🔟 year ODI series drought comes to an end against Bangladesh.👏🏾
WI win the CG United ODI series with one more match to play.🏆 #WIvBAN | #WIHomeForChristmas pic.twitter.com/rFdct1EQNg
— Windies Cricket (@windiescricket) December 10, 2024
आता सलग दुसरा सामना जिंकून वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्धची 10 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. वास्तविक, बांगलादेशविरूध्द एकदिवसीय मालिका जिंकण्याची गेल्या 10 वर्षांतील म्हणजे साल 2014 नंतरची वेस्टइंडिजची ही पहिलीच वेळ आहे. याआधी रविवारी याच मैदानावर संघानं खेळवण्यात आलेला पहिला सामना पाच गडी राखून जिंकला होता. याच मैदानावर गुरुवारी तिसरा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर बांगलादेशने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. एकेकाळी त्यांची धावसंख्या सात विकेट्सवर 115 धावा होती. पण महमुदुल्लाह (62) आणि तंजीम हसन साकिब (45) यांनी येथून 92 धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. यादरम्यान सलामीवीर तनजीद हसनने 46 धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून सील्सने 22 धावांत चार बळी घेतले.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजसाठी लक्ष्य गाठणे ही केवळ औपचारिकता होती. ब्रँडन किंग आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 21 षटकांत 109 धावांची भागीदारी करून वेस्ट इंडिजला धमाकेदार सुरुवात करून दिली. किंगने 76 चेंडूत 8 चौकार अन् 3 षटकाराच्या मदतीने 82 धावा केल्या तर इविन लुईस (49) आणि केसी कार्टी (45) यांची अर्धशतके हुकली. त्यानंतर शाई होपनं 21 चेंडूत नाबाद 17 आणि शेरफेन रदरफोर्डनं 15 चेंडूत नाबाद 24 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. बांगलादेशकडून गोलंदाजीत नाहीद राणा, रिशाद हुसेन आणि अफिफ हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.




