Women’s T20 World Cup 2024 : भारताची विश्वचषक मोहीम आजपासून! विजयी पाऊल टाकायला हरमनप्रीतसेना सज्ज…

ICC Women’s T20 World Cup 2024 (IND vs NZ) : – भारतीय महिला संघ आपल्या टी-20 विश्वकरंडक मोहिमेला आजपासून सुरुवात करणार आहे. यामध्ये भारतासमोर न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. भारताच्या अनुभवी खेळाडू कर्णधार हरामनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा व दीप्ती शर्मा यांच्याकडून भारताला मोठ्या आशा आहेत.
या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका व न्यूझीलंड या संघाचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात शुक्रवारी न्यूझीलंड संघापासून होणार आहे. आजच्या लढतीमध्ये स्मृती मंधाना, शेफाली वर्मा व कर्णधार हरामनप्रीत कौर यांच्यावर भारतीय फलंदाजीची मदार असणार आहे.
चालू हंगामात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली होती. यामध्ये सलामीवीर असलेल्या स्मृती मंधानाने न्यूझीलंड विरुद्ध खेळताना 134.93 च्या स्ट्राईक रेटने 197 धावा केल्या असून यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. शेफाली वर्मा देखील या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात धावा करत आहे.
गोलंदाजीच्या बाबतीत रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर आणि अरुंधती रेड्डी यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे. भारताकडे सध्याच्या घडीला ऑफस्पिनर दीप्ती आणि श्रेयांका पाटील, लेग स्पिनर आशा शोभना व डावखुऱ्या राधा यादवचा समावेश आहे. मात्र यापैकी केवळ दोन किंवा तीन खेळाडूंना संधी मिळू शकेल.
भारताच्या बरोबरीने न्यूझीलंडच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार सोफी डेव्हाईन, अनुभवी अष्टपैलू सुझी बेट्स, ली ताहुहू आणि लेह कॅस्परेक हे खेळाडू न्यूझीलंडसाठी महत्वाची भूमिका बजावतील.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे….
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, यादव, यादव श्रेयंका पाटील, संजना संजीवन.
न्यूझीलंड : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गझ, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, मेली केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली टाहुहू .





