Women Safety – कामशेत येथील एका फॅन्सी दुकानाच्या स्टोअररूममध्ये पीडित महिलेला कपडे बदलण्यासाठी पाठवून तिचे चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित दुकानमालकाला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी मुकेश मुथा (रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मार्च २०२६ ला दुपारी कामशेत येथील ‘मुकेश फॅन्सी कॉर्नर’ दुकानात हा प्रकार घडला. आरोपीने आपल्या दुकानातील स्टोअररूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याची जाणीव असतानाही पीडित महिलेला कपडे बदलण्यासाठी तेथे पाठवले. त्यानंतर कपडे बदलतानाचे जाणीवपूर्वक चित्रीकरण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच पीडितेला धमकी दिली. दरम्यान, आरोपी मुकेश मुथा याला अटक करून शुक्रवारी (दि. १०) वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.