Women Education : दहावीच्या निकालात ‘जावळी पॅटर्न’चा डंका! उमेदच्या ८१ महिलांनी वयाच्या चाळीशीत गाठलं शिखर
Women Education : घरकाम, शेती आणि मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळून ४०-५० व्या वर्षी मिळवली प्रथम श्रेणी; जावळी तालुक्यात नवा शैक्षणिक पॅटर्न.

Women Education – आयुष्य पुन्हा पुन्हा संधी देत नाही असं म्हणतात, मात्र खेडेगावातील ज्या महिलांचे परिस्थितीअभावी अर्धवट शिक्षण राहिले होते, त्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी ऊमेद आणि प्रथम टीमकडून ‘सेकंड चान्स’ मिळाला, आणि त्यांनी त्याचे सोने केले. नुकत्याच झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत जावळी तालुक्यातून उमेदच्या तब्बल नव्वद महिला परीक्षेला बसल्या आणि त्यातील ऐंशी महिला पासही झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्यातील दहाहून अधिक महिलांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे.
पाच- पंचवीस वर्षाच्या गॕपनंतर, वयाच्या चाळीशी पन्नाशीत, हाती पेन धरणार्या आणि वर्गात बेंचवर बसून धडे गिरवणार्या या महिलांनी महिला शिक्षणाचा नवा जावळी पॕटर्न निर्माण केला आहे. शिक्षण थांबलं तरी जिद्द थांबली नव्हती, हेच ग्रामीण महिलांनी सिद्ध करून दाखवले आहे. अनेक वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर, संसाराचा गाडा हाकता हाकता आणि घरकाम सांभाळत या महिलांनी उमेद अभियानांतर्गत घेतलेल्या परीक्षेत मोठे यश मिळवले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून आणि प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रथम टीम आणि उमेद टीमच्या पुढाकाराने या परीक्षेसाठी तालुक्यातील ८४ महिला बसल्या होत्या, त्यापैकी ८१ महिलांनी यशस्वीरीत्या ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे कोमल दगडू भिलारे (६८.४०%),
कार्तिकी वामन आढाव (६७.८० टक्के), सुषमा यशवंत लोखंडे (६७.४० टक्के ) आणि योगिता मोहन चव्हाण (६६ टक्के) यांनी गुणवत्तेत अव्वल स्थान पटकावले आहे. या महिलांच्या यशाचा प्रवास सोपा नव्हता. लग्नानंतर आणि मुलांच्या जबाबदारीमुळे अनेकींचे शिक्षण अर्धवट सुटले होते. मात्र, उमेद अभियानाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा अभ्यासाची संधी मिळाली.
घरकाम, मुलांचा अभ्यास आणि शेतीची कामे आटोपून मिळेल त्या मोकळ्या वेळेत या महिलांनी पुस्तके हातात धरली. त्यांच्या या कष्टाचे फळ आज निकालाच्या रूपाने समोर आले आहे. या यशाबद्दल गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील यांनी, तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद अंकुश मोटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिक्षण घेण्यास कोणतेही वय नसते, हा संदेश या महिलांनी या निमित्ताने संपूर्ण समाजाला दिला आहे.
आयुष्य बदलवणारा ‘सेकंड चान्स’
हा निकाल केवळ शैक्षणिक प्रगती नसून या महिलांच्या आत्मविश्वासाला नवी भरारी देणारा ठरला आहे. या यशामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे. या उपक्रमात जावली तालुका उमेद टीम पंचायत समिती जावळीने विशेष प्रयत्न करून या महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
या उपक्रमासाठी तालुका व्यवस्थापक नीलेश भोसले, प्रथमच्या तालुका समन्वयक, अपर्णा देवरे, उमेदचे प्रभाग समन्वयक आल्पेश खरात, संगीता देशमाने, औदुंबर नावडकर, प्रेरिका वैशाली पांगारे, संगीता परिहार, अश्विनी धनावडे, दीपिका पवार, सीमा रांजणे, स्नेहल रांजणे, अनुजा कांबळे यांनी वर्षभर विशेष परिश्रम घेतले.
“करहर या माझ्या गावामधून १२ महिला उत्तीर्ण झाल्या. सर्व उमेद टीमने दिलेली प्रेरणा आणि सहकार्य यामुळे हे शक्य झालं. मी फक्त निमित्तमात्र आहे. या वयात सुद्धा महिलांचे स्वप्न पूर्ण झालं फक्त उमेदमुळे याचा खूप आनंद आहे.”
– वैशाली पांगारे, (प्रेरिका करहर- उमेद)






