Wai Crime News: वाई पोलिसांचा धाक कुठे हरवला? गुटखा विक्री, कर्णकर्कश बुलेट अन् चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त
Wai Crime News: शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीन दुचाकीस्वारांचा धुमाकूळ; नियमबाह्य बुलेट सायलेन्सरमुळे ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मनस्ताप.

Wai Crime News : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन, गुटख्याची कथित खुलेआम विक्री, बुलेटच्या मॉडिफाइड सायलेन्सरमधून निघणारे कर्णकर्कश आवाज तसेच वाढत्या चोर्यांच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकारांवर पोलिसांकडून अपेक्षित तीव्रतेने कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून,
‘पोलिसांचा धाक कुठे हरवला आहे?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील काही भागांत युवकांकडून ट्रिपलसीट प्रवास, वेगाने वाहन चालविणे तसेच अल्पवयीनांकडून दुचाकी चालविण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीनांकडून दुचाकी चालविली जात असल्यास त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
बुलेटच्या मॉडिफाइड सायलेन्सरचा त्रास
शहरातून काही बुलेटस्वार मॉडिफाइड सायलेन्सरच्या माध्यमातून फटाक्यांसारखे मोठे आवाज करत फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. रात्रीच्या वेळी अचानक होणार्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि रुग्णांना त्रास होत आहे. अशा वाहनांची तपासणी करून नियमबाह्य सायलेन्सरचा वापर करणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
गुटखा विक्रीवर कारवाईची मागणी
राज्यात गुटख्याच्या विक्रीवर निर्बंध असताना वाई शहरातील काही पानटपर्यांवर गुटखा उपलब्ध होत आहे. विशेषतः युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाच्या पार्श्वभूमीवर गुटखा नेमका कुठून येतो, त्याचा पुरवठा कोण करतो आणि त्यामागे कोणती साखळी कार्यरत आहे, केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता पुरवठ्याच्या साखळीपर्यंत पोहोचण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘सीसीटीव्ही नाही’वर तपास थांबू नये
शहरातील चोरीच्या घटनांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेजचा अभाव अडथळा ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र सीसीटीव्ही उपलब्ध नसतानाही पोलिसांकडे तपासासाठी इतर अनेक पारंपरिक व तांत्रिक साधने उपलब्ध आहेत. खबर्यांचे जाळे, तांत्रिक तपास, संशयितांची चौकशी, चोरीच्या मालाच्या विक्रीच्या मार्गाचा मागोवा तसेच स्थानिक गुन्हेगारी साखळीचा शोध घेऊन तपासाला दिशा देता येते.
त्यामुळे सीसीटीव्ही उपलब्ध नसलेल्या प्रकरणांतही तपासाची गती कायम ठेवण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर सातत्याने आणि दृश्यमान कारवाई झाल्यासच कायद्याचा धाक निर्माण होईल, त्यामुळे वाई पोलिसांनी वाहतूक, अवैध गुटखा विक्री आणि चोरीच्या घटनांबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.






