‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम: पुण्यात १२३ महिलांच्या तक्रारींचे निराकरण, अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती

Pune News | कालपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवासांचा पुणे जिल्हा दौरा सुरू झाला असून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पुणे शहर विभागासाठी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.
या उपक्रमाचा हेतू असा होता की प्रत्येक महिलेला महिला आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने तिथे पोहचणे शक्य नसल्याने आयोग स्वत: पुणे जिल्ह्यामध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून आला आहे. याचे कारण न्याय हा प्रत्येक महिलेला तिच्या दारी मिळायला हवा, हेच आमचे ध्येय असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. याविषयीची पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स या अकाउंटवरून शेअर केली आहे. या उपक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे देखील त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
काल झालेल्या जनसुनावणीत १२३ तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. या तक्रारी प्रामुख्याने कौटुंबिक छळ, मालमत्ता व इतर गंभीर विषयांशी संबधित होत्या. या उपक्रमामुळे एकाच छताखाली पोलीस, प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित असल्याने महिलांच्या तक्रारीवर त्वरीत निर्णय घेणे शक्य झाले.
महिला आयोग आपल्या दारी” – महिलांच्या न्यायासाठी एक ठोस पाऊल !
आज पासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा तीन दिवसांचा पुणे जिल्हा दौरा सुरु करताना, “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमा अंतर्गत पुणे शहर विभागासाठी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे जनसुनावणी घेण्यात आली.… pic.twitter.com/yoBThze3M4
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 15, 2025
या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या जनसुनावणी बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस आदी अधिकारी उपस्थित होते.
पुढील जनसुनावण्या: १६ एप्रिल – जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे ग्रामीण १७ एप्रिल – पिंपरी चिंचवड महिलांनी धैर्याने पुढे यावे, आयोग आपल्या सोबत आहे, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.





