Women’s Asia Cup 2024 : पाकच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम, नेपाळचा 9 विकेट्सने केला पराभव…

Women’s Asia Cup 2024 (PAK vs NEP) : महिला आशिया चषक 2024 च्या सहाव्या सामन्यात रविवारी पाकिस्तानने नेपाळचा नऊ विकेट्सने पराभव केला. या मोठ्या विजयामुळे पाकिस्तानचा निव्वळ धावगती सुधारली आहे आणि त्यांच्या उपांत्य फेरी गाठण्याच्याआशाही कायम आहेत. आता पाकिस्तानचा पुढील सामना मंगळवारी(दि.23 जुलै) युएईशी होणार आहे.
आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाविरूध्द 7 विकेट्सनी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा नेट रनरेट मायनसमध्ये गेला होता. नेपाळला 9 विकेट्सच्या फरकाने पराभूत केल्यानंतर त्यात कमालीची सुधारणा झाली आहे. यासह ‘अ’ गटातील गुणतालिकेत पाकचा संघ दोन गुणांसह नेपाळला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याची निव्वळ धावगती +0.409 आहे. त्याच वेळी, नेपाळने दोन गुण आणि -0.819 च्या निव्वळ रनरेटसह तिसरे स्थान गाठले. या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
2 points for Pakistan ✅@MuneebaAli17 and Gull Feroza shine with a 105-run stand, Pakistan’s second-highest opening partnership in Women’s T20Is, leading to a commanding victory! 🙌#PAKWvNEPW | #WomensAsiaCup2024 | #BackOurGirls pic.twitter.com/RMRzRQb302
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 21, 2024
रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर नेपाळने 20 षटकांत 6 बाद 108 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुल फिरोज आणि मुनिबा अली यांच्यातील 105 धावांच्या तुफानी भागीदारीमुळे पाकिस्तानने 49 चेंडू शिल्लक असताना आणि नऊ गडी राखून सामना जिंकला. सध्याच्या स्पर्धेतील हा पाकिस्तानचा पहिला विजय आहे.
विजयासाठी 109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी गुल फिरोजा आणि मुनिबा अली यांनी दमदार कामगिरी केली. या दोघींमध्ये पहिल्या विकेटसाठी 105 धावांची मोठी भागीदारी झाली. फिरोजाने 35 चेंडूंचा सामना करत 10 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. तर मुनिबाने 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 46 धावांची खेळी केली. याशिवाय तुबा हसन एक धाव घेत नाबाद राहिली. नेपाळकडून कविता जोशीने एकमेव विकेट घेतली.
Women’s Asia Cup 2024 : भारताचा सलग दुसरा विजय, युएईचा 78 धावांनी पराभव करत गाठली उपांत्य फेरी…
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नेपाळची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिला धक्का फातिमा सनाने चार धावांवर दिला. तिने समझना खड़काला नशराकरवी झेलबाद केले. तिला फक्त चार धावा करता आल्या, तर यूएईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात समझनाने अर्धशतक झळकावले होते. मात्र, या सामन्यात तिला आपल्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. नेपाळकडून फलंदाजीत सीताने 26, कविताने 13, रुबिनाने 08, पूजाने 25, कविता जोशीने नाबाद 31 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सादिया इक्बालने दोन आणि फातिमा सनाने एक विकेट घेतली.





