Women’s Asia Cup 2024 : टीम इंडियाला विजयी हॅटट्रिक करण्याची संधी, नेपाळविरूध्द आज रंगणार लढत…

Women’s Asia Cup 2024 (W IND vs W NEP) : महिला आशिया चषक 2024 च्या गट टप्प्यातील भारताचा तिसरा सामना आज (मंगळवार,23 जुलै) नेपाळविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारताचा सलग तिसरा विजय नोंदवण्याचे लक्ष्य असेल. टीम इंडिया चार गुणांसह आणि +3.386 च्या निव्वळ रनरेटसह अ गटाच्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाचे सहा गुण झाले की ते थेट उपांत्य फेरीत धडक मारतील.
पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट राखून पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात युएई (UAE) चा 78 धावांनी पराभव केला. नेपाळला पहिल्या सामन्यात एमिरेट्सचा (UAE) पराभव करण्यात यश आले होते पण दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून 9 विकेटने पराभव स्वीकारावा लागला आहे. भारताने उपांत्य फेरीत जवळपास प्रवेश निश्चित केला आहे तर पाकिस्तानने गेल्या सामन्यात मोठा विजय नोंदवून आपल्या धावगतीमध्ये लक्षणीय सुधारणा केल्यामुळे त्यांच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.
भारताची टॉप ऑर्डर चांगल्या फॉर्ममध्ये…
भारतीय संघ इतर संघांच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा विजयी मालिका सुरू ठेवण्यावर भर देईल. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली असून, ती पुढेही कायम ठेवण्याचा त्यांचा निर्धार असेल. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या सलामीच्या जोडीने पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष यांनी एमिरेट्सविरुद्ध (UAE) शानदार अर्धशतके झळकावली होती.
नेपाळ भारताला देऊ इच्छितो आव्हान…
इंदू बर्माच्या नेतृत्वाखालील नेपाळ संघाने अमिरातीविरुद्धच्या विजयासह चांगली सुरुवात केली होती, परंतु पाकिस्तानविरुद्ध त्यांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. आता त्याच्या संघाला भारताच्या आव्हानाची चांगलीच कल्पना असेल आणि त्यामुळे भारतीय संघाला अडचणीत आणायचे असेल तर त्याच्या खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
तर पाकची वाट होणार खडतर….
पाकिस्तान आणि नेपाळने खेळलेल्या 2 सामन्या पैकी प्रत्येकी 1 सामना गमावलाय आणि 1 सामना जिंकलाय. त्यामुळे नेपाळसाठी टीम इंडिया विरुद्धचा सामना अटीतटीचा असा असणार आहे. तसेच या सामन्याच्या निकालाकडे पाकिस्तानचं लक्ष असणार आहे. नेपाळने हा सामना गमावल्यास पाकिस्तान नेट रनरेटच्या जोरावर पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे इंडिया-नेपाळ हा सामना निर्णायक असणार आहे. नेपाळने विजय मिळवल्यास पाकची वाट खडतर होणार आहे.
भारताचे दोन सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. तर नेपाळचे दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभवासह दोन गुण आहेत. युएई आणि पाकिस्तानचे संघही मंगळवारीच आमनेसामने येणार आहेत. नेपाळ आणि पाकिस्तानचे समान गुण आहेत, मात्र नेट रनरेटच्या बाबतीत पाकिस्तान पुढे आहे. नेपाळला पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, अन्यथा पाकिस्तान पुढच्या फेरीसाठी पात्र ठरेल.
यूएईविरुद्ध भारताने केला विक्रम…
स्फोटक फलंदाज रिचा घोषने अमिरातीविरुद्ध 29 चेंडूत 64 धावा केल्या, ज्यामुळे भारत महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच 200 धावांचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरला. हरमनप्रीतने 47 चेंडूत 66 धावा करत तिला चांगली साथ दिली होती.





