Women’s Asia Cup 2024 : कर्णधार चमारीचे विक्रमी शतक, मलेशियाविरूध्द मोठ्या विजयासह श्रीलंकेची उपांत्य फेरीत धडक..

Women’s Asia Cup 2024 (Chamari Athapaththu, SL vs MAL) : श्रीलंकेत खेळल्या जात असलेल्या महिला आशिया कपमध्ये यजमान संघाने नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर मलेशियाविरुद्ध 144 धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार चमारी अटापट्टूच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं 4 विकेट गमावून 184 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला मलेशियाचा संघ अवघ्या 40 धावांत गडगडला.
या विजयासह श्रीलंकेने आपल्या गटातील दुसरा विजय मिळवून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता आणि सोमवारी(दि.22 जुलै) त्यांनी मलेशियाचा पराभव केला आहे, तर मलेशियाचा संघ या पराभवासह स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे.
MASSIVE WIN for our Lionesses! 🦁🇱🇰 We’ve crushed Malaysia by 144 runs and secured our spot in the #WomensAsiaCup2024 semi-finals!
This is SL’s biggest-ever Women’s T20I win by the margin of runs! #GoLionesses
🔥 This team is on FIRE! 🔥 pic.twitter.com/EcKr7ZO3tI
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 22, 2024
यजमान श्रीलंकेने सोमवारी महिला आशिया चषक स्पर्धेत मलेशियाविरुद्ध अप्रतिम खेळ केला. आशिया कप टी-20 च्या इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवून खळबळ उडवून दिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेला अवघ्या 5 धावांवर पहिला धक्का बसला पण यानंतर कर्णधाराने 119 नाबाद धावांची तुफानी खेळी खेळून सामन्याचा नकाशाच बदलून टाकला.
श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू आशिया कप टी-20 च्या इतिहासात शतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली आहे. तिने 63 चेंडूत शतक पूर्ण केले तर 69 चेंडूत 14 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 119 धावांची अप्रतिम खेळी केली. याव्यतिरिक्त हर्षिता समरविक्रमाने 26 धावांची तर अनुष्का संजीवनीने 31 धावांची खेळी खेळली.
श्रीलंकेसमोर 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला मलेशियाचा संघ 19.5 षटके खेळून अवघ्या 40 धावांवर गारद झाला. केवळ एका फलंदाजाला 10 धावा करता आल्या, याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकली नाही. एल्सा हंटरने 11 चेंडूत 10 धावा केल्या तर 4 फलंदाज आपले खातेही उघडू शकल्या नाहीत. श्रीलंकेकडून गोलंदाजीत शशिनी गिम्हानीने 4 षटकांत 9 धावा देत 3 बळी घेतले. तर काव्या कविंदी आणि कविशा दिलहरी यांनी प्रत्येकी 2 यश संपादन केले.





