Women’s Asia Cup 2024 (Semi Final 2) : थरारक सामन्यात श्रीलंकेचा पाकवर विजय, भारता विरुद्ध होणार जेतेपदाचा सामना…

Women’s Asia Cup 2024 : महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव करून स्पर्धेतील आपले तिकीट पक्के केले, तर श्रीलंकेने पाकिस्तानला रोमहर्षक सामन्यात पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 4 गड्यांच्या मोबदल्यात 140 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान श्रीलंकेने शेवटच्या षटकात म्हणजेच 19.5 षटकात 7 विकेट गमावून 141 धावा करत हे लक्ष्य गाठले. कर्णधार चमारी अटापट्टूने शानदार अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.
ROAR! 🇱🇰 Sri Lanka secures a thrilling 3-wicket victory over Pakistan and charges into the finals of the #WomensAsiaCup2024! What a match! 💪💥 Let’s go, Lionesses! #GoLionesses #SLvPAK pic.twitter.com/vorzkdMp4U
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 26, 2024
सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर गुल फिरोजा आणि मुनिबा अली यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली आणि अर्धशतकी भागीदारी केली. फिरोझा 25 धावा करून बाद झाली तर मुनिबाने 37 धावा केल्या. या दोन्ही फलंदाजांना उदेशिका प्रबोधनी बाद करत माघारी धाडलं. पाकिस्तानची कर्णधार निदा दार 23 धावांची इनिंग खेळून बाद झाली आणि याशिवाय दुसरा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही आणि पाकिस्तानने 20 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 140 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिल्याच षटकात विश्मी गुणरत्नेच्या रूपाने मोठा धक्का बसला. तिसऱ्याच चेंडूवर सादिया इक्बालने खाते न उघडू देता तिला माघारी धाडलं. यानंतर संघाची धावसंख्या 19 असताना हर्षिता समरविक्रमाला ओमामा सोहेलने बाद केले. मात्र, श्रीलंकेची कर्णधार चमारीने एका टोकाला उभी राहून आपले अर्धशतक पूर्ण केले. 48 चेंडूत 63 धावा करून ती बाद झाली आणि सामन्याचे चित्र पालटलं. एकेकाळी पाकिस्तान सामना जिंकेल असे वाटत होते पण अनुष्का संजीवनीने आपल्या समंजस खेळीने संघाला विजय मिळवून दिला. संजीवनीने 22 चेंडूत 24 धावांची महत्वपूर्ण अशी खेळी केली.
Women’s Asia Cup 2024 : टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक; बांगलादेशला हरवून रचला इतिहास…
अंतिम फेरीत भारताचे आव्हान…
महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना 28 जुलै रोजी दुपारी 3.00 वाजता खेळवला जाणार आहे ज्यात श्रीलंकेचा सामना 7 वेळा चॅम्पियन टीम इंडियाशी होणार आहे. श्रीलंकेला आजतागायत आशिया चषक जिंकता आलेला नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आशियाई चॅम्पियन बनण्याची सुवर्णसंधी आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव केला होता.





