पुण्यातल्या महिला असुरक्षित; दररोज लाडकी बहीण होतेय वासनेची शिकार, धक्कादायक आकडेवारी समोर

Pune Crime : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६, रा. शिक्रापूर) अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. यातच आता आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसामध्ये लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. याच ठिकाणी असलेल्या घरात आरोपी दत्तात्रय गाडे हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, स्वारगेट बस डेपो येथील घटनेनंतर पुण्यातील बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार, पुण्यात दर दिवसाला एकापेक्षा अधिक बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. १ जानेवारी ते १८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान तब्बल १२५ घटनांची नोंद झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
शहरात दोन वर्षांमध्ये तब्बल ९१५ अत्याचार झाल्याच्या घटनांची नोंद झाली असून १५०० महिलांचे विनयभंग झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सरासरी पाहता दर दिवसाला एकापेक्षा अधिक अत्याचाराच्या घटना पुण्यात घडल्या आहेत. स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या बलात्कार घटनेनंतर ही आकडेवारी समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर हस्तमैथून
पुण्यात मंगळवारी पहाटे स्वारगेट ST स्टॅण्डमध्ये घडलेली घटना ताजी असतानाच आता दुसरीकडे कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर हस्तमैथून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडे सात वाजता, कल्याणीनगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली.
संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी कॅब आली. गाडी चालवत असताना, आरोपी ड्रायव्हर सुमित कुमारने रियर व्ह्यू मिररमधून महिलेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यामुळे भयभीत झालेल्या महिलेने सिग्नलला गाडी थांबताच पळ काढला आणि पोलिस स्टेशन गाठले. रविवारी खडकी पोलिसांनी 20 वर्षीय कॅब ड्रायव्हर सुमित कुमारला अटक केली.





