Raigad – चालत्या कारवर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात घडली आहे. स्नेहल गुजराती असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना माणगाव तालुक्यातील कोंडेथर गावाजवळ गुरुवारी घडली. ही महिला आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहून माणगावच्या दिशेने येत होती. ताम्हिणी घाटातून जात असताना डोंगरावरून एक भला मोठा दगड त्यांच्या चारचाकी वाहनावर कोसळला. यात वाहनाचा सनरूफ तोडून हा दगड स्नेहल यांच्या डोक्यावर आदळला. ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र त्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी माणगाव पोलीस पुढील तपास करत आहोत. कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या पावसामुळे लहान मोठ्या दरडी कोसळत असतात. त्यामुळे आंबेनळी घाट, भोर घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी नियंत्रित केले जातात. त्या तुलनेत ताम्हिणी घाट हा प्रवासासाठी सुरक्षित मानला जातो. पण या घटनेमुळे या घाटातील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. दरम्यान, घाटरस्त्यावरील दरडी कोसळण्याच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून जोर धरत आहे.