#WIvENG 1st T20 : दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या रसेलची अष्टपैलू कामगिरी; विंडीजचा इंग्लंडवर 4 विकेट्सनं विजय..

ENG vs WI 1st T20I : पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये इंग्लंड क्रिकेट संघाची स्थिती सध्या खूपच वाईट आहे. 2023 च्या विश्वचषकातील फ्लॉप शोनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर वनडे मालिका गमवावी लागली. मोठी गोष्ट म्हणजे इंग्लंडचा संघ अशा संघाकडून पराभूत झाला जो वनडे विश्वचषकासाठीही पात्र ठरू शकला नाही. एवढे सगळे होऊनही इंग्लंडची गाडी रुळावर आली नाही. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
ब्रिजटाउन, बार्बाडोस येथे आज (13 डिसेंबर) खेळल्या गेलेल्या या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने 11 चेंडू शिल्लक असताना इंग्लंडचा चार विकेट राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 6 गडी गमावून सहज लक्ष्य गाठले.
इंग्लंडने केल्या 64 चेंडूत 117 धावा
या सामन्यात विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करत अवघ्या 6 षटकांत पहिल्या विकेटसाठी 77 धावा जोडल्या. येथे फिल सॉल्ट 20 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार जोस बटलरसह विल जॅकने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. विल जॅक 9 चेंडूत 17 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर जोस बटलरही 39 धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.
बटलर बाद होताच इंग्लिश डाव गडगडू लागला. जो संघ एकेकाळी 10.4 षटकात 2 बाद 117 च्या मजबूत धावसंख्येवर उभा होता. काही वेळातच तो पत्त्याच्या घरासारखा कोसळला. इंग्लंडने 54 धावांत शेवटच्या आठ विकेट गमावल्या. इंग्लडंला पूर्ण 20 षटकेही खेळता आली नाहीत. इंग्लंडचा संघ 19.3 षटकांत 171 धावांत गडगडला. येथे वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेल आणि अल्झारी जोसेफ यांनी 3-3 बळी घेतले. रोमारियो शेफर्डलाही दोन बळी मिळाले.
रसेल-पॉवेलची 21 चेंडूत 49 धावांची भागीदारी
वेस्ट इंडिजने 172 धावांचं लक्ष्य अतिशय वेगानं पार केलं. सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. ब्रेंडन किंग 12 चेंडूत 22 धावा करून बाद झाला तर काइल मेयर्सने 21 चेंडूत 35 धावांची जलद खेळी केली. काइल मेयर्स बाद झाला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या 7.1 षटकात 71 धावा होती. येथून शाई होप आणि निकोलस पुरन यांनी संथ गतीने डाव पुढे नेला. 10.2 षटकात संघाची धावसंख्या 100 असताना पूरण 13 धावा काढून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ शिमरॉन हेटमायरही (15) माघारी परतला. विडिंज संघाची धावसंख्या 123 वर पोहचेपर्यंत शाई होप (36) आणि रोमॅरियो शेफर्ड (0) देखील पॅव्हेलियनमध्ये परतले.
आता वेस्ट इंडिजला विजयासाठी 32 चेंडूत 49 धावांची गरज होती आणि त्यांच्या फक्त 4 विकेट शिल्लक होत्या. येथून कर्णधार रोव्हमन पॉवेल (31) आणि आंद्रे रसेल (29) यांनी 200+ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि केवळ 21 चेंडूत 49 धावांची नाबाद भागीदारी करून आपल्या संघाला विजयाकडे नेले. आंद्रे रसेलला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले.





