Keemo Paul Record : कीमो पॉलने रचला इतिहास! भारताविरुद्ध ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज
Keemo Paul Record : हैदराबाद येथे भारताविरुद्धच्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात कीमो पॉलने ४१ धावांत पाच विकेट्स घेतले. त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने भारतावर २४ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली.

Keemo Paul Takes Five Wickets Against India in Hyderabad Historic T20 Spell : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० लढतीत कॅरेबियन वेगवान गोलंदाज कीमो पॉलने सामन्याला कलाटणी देणारा स्पेल टाकला. पॉलने भेदक मारा करत अवघ्या ४१ धावांत ५ फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याच्या या घातक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने भारताचा २४ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. पॉलने या ऐतिहासिक कामगिरीसह अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर कोरले आहेत.
संजू ते अक्षर; पाच फलंदाजांची शिकार करत उडवली दाणादाण –
१४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या हायव्होल्टेज सामन्यात कीमो पॉलने भारताची मजबूत फलंदाजी उद्ध्वस्त केली. त्याने वादळी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनसह इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, प्रिन्स यादव आणि अक्षर पटेल या पाच प्रमुख फलंदाजांना बाद केले. आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत एका डावात ५ विकेट्स घेण्याची ही त्याची दुसरी वेळ ठरली. याआधी २०२२ मध्ये मिरपूर येथे बांगलादेशविरुद्ध त्याने असा पराक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये एकापेक्षा जास्त वेळा पाच विकेट्स घेणारा तो कसोटी खेळणाऱ्या देशांमधील केवळ सहावा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
भारताच्या भूमीवर ५ विकेट्स घेणारा पहिलाच परदेशी गोलंदाज –
💥 5 WICKETS IN JUST 2 OVERS!
🎯 2 wickets in his first over!
🎯 3 wickets in his final over!💣 ABSOLUTE DESTRUCTION FROM KEEMO PAUL! 🔥
📸 Image Credit: JioStar
#INDvsWI #KeemoPaul https://t.co/hLlmH6UsYX
— CricInformer (@CricInformer) October 14, 2026
हैदराबादमधील या स्पेलसह कीमो पॉलने अनोखा इतिहास रचला. भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताविरुद्ध ५ विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज बनला आहे. यापूर्वी २०१६ च्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने नागपूरमध्ये ११ धावांत ४ विकेट्स घेतले होते. आता पॉलने ४१ धावांत ५ विकेट्स मिळवून सँटनरचा हा जुना विक्रम मोडीत काढला आहे.
ओबेड मॅकॉयच्या खास क्लबमध्ये एन्ट्री –
भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५ विकेट्स घेणारा कीमो पॉल वेस्ट इंडिजचा केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी २०२२ मध्ये ओबेड मॅकॉयने वॉर्नर पार्कवर १७ धावांत ६ विकेट्स घेत भारतीय फलंदाजीचा फडशा पाडला होता. आता हैदराबादमध्ये पॉलने केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या बळावर विंडीजने मालिका बरोबरीत आणली असून, मालिकेचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे.





