‘साक्षी साफ खोटे बोलत आहे…’; अल्पवयीन कुस्तीपटूंच्या वडिलांचा दावा

नवी दिल्ली -आंदोलनात सक्रीय असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकला एक मोठा धक्का बसला आहे. एकूणच या आंदोलनाचा वेगळेच वळण लागत असल्याचे एक घटनेतून समोर आले आहे. अल्पवयिन महिला कुस्तीपटूचे लैंगिक शोषण झाले होते मात्र, तीच्यासह कुटुंबियांना धमकावल्यामुळेच त्यांनी दिलेला दबाब बदलला असे साक्षिने म्हटले होते. मात्र, आता साक्षि साफ खोटे बोलत असून आम्हाला कोणीही धमकावलेले नाही, असे धक्कादायक विधान या अल्पवयिन महिला कुस्तीपटूच्या वडीलांनी केले आहे.
भारतीय कुस्तीगिर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सात महिला कुस्तीपटूंच लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात खटलाही सुरु आहे. तसेच पोलीस तपास व चौकशीही सुरु आहे. आता कुठे यातून मार्ग निघेल अशी चिन्हे दिसू लागली होती. मात्र, अल्पवयिन महिला कुस्तीपटूच्या वडीलांनी केलेल्या या वक्तव्यानंतर या आंदोलनातील हवाच काढून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पोलीस तपास पूर्ण होऊन त्याचा अहवाल येइपर्यंत सध्या या कुस्तीपटूंनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, ब्रिजभूषण यांना अटक झाली नाही व आमच्या इतर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन पुन्हा एकदा सुरु केले जाइल असा इशारा साक्षिसह विनेश फोगट व बजरंग पुनिया यांनी दिला आहे.
ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भारतीय कुस्तीपटूंपैकी साक्षीने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी दावा केला की अल्पवयीन कुस्तीपटूने प्रथम त्यांचे म्हणणे रेकॉर्ड केले परंतु नंतर ते बदलले. कदाचित त्यांच्यावर दबाव आणला गेला असावा आणि त्याच्या कुटुंबाला धमकावले गेले असावे.
साक्षीच्या या दाव्यानंतर लगेचच या अल्पवयीन महिला कुस्तीपटूच्या वडिलांनी हा दावा खोडून काढला आहे. आम्हाला व आमच्या संपूर्ण परिवाराला कोणीही धमकावलेले नसून साक्षी खोटे बोलत आहे, असे तीच्या वडीलांनी म्हटले आहे.
दरम्यान, साक्षीने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे पती सत्यव्रत कादियानही साक्षीच्याच बोलण्याला दुजोरा देताना दिसत आहेत. तसेच आमचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित नव्हते आणि त्यात कोणत्याही पक्षाचा सहभाग नाही. यापूर्वीही आम्हाला ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करायचे होते, पण कुस्तीपटूंमध्ये एकजूट नसल्याने ते होत नव्हते.
कोणत्याही कुस्तीपटूने त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कारकिर्दीला अडचणी येऊ लागल्या होत्या. ही केवळ आमची सत्याची लढाई आहे व आता कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही, असेही साक्षीचे पती सत्यव्रत यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त संघटनांबाबत आज चौकशी
महासंघाच्या निवडणूकीत ज्या राज्य संघटनांना मतदान करण्याचा अधिकार आहे त्यातील पाच राज्य संघटनांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्र, तेलंगाणा, हिमाचल प्रदेश, हरियाणा व राजस्थान या संघटनांनी मुदत उलटून गेल्यावरही आपल्या मतदारांची नावे कळवलेली नसल्याने त्यांना आज (बुधवार) पाचारण करण्यात आले असून त्यातून तोडगा काढला जाणार आहे, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली आहे. या पाचही संघटनांवर सध्या हंगामी समिती कार्यरत असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑलिम्पिक संघटनेचे लक्ष
कुस्ती महासंघातील या सर्व घडामोडींवर भारतीय ऑलिम्पिक संघटना लक्ष ठेवून आहे. महासंघाची निवडणूक येत्या 6 जुलैला होत असल्याने त्यापूर्वी हे सर्व वाद मिटवणे गरजेचे बनले आहे. तसेच कुस्तीपटूंनीही आपल्या स्पर्धा व सरावावर लक्ष केंद्रित करावे यासाठीही संघटना पुढाकार घेणार आहे.





