Wimbledon Open 2024 (Women’s) : चेक प्रजासत्ताकची क्रेजिकोव्हा ठरली विम्बल्डनची ‘क्विन’

Wimbledon 2024 Women’s Singles Final Highlights: :- टेनिस विश्वातील मानाच्या वर्षातील तिसऱ्या विम्बल्डन या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेजिकोव्हा इटलीच्या जास्मिन पाओलिनीला मात देत ‘क्विन’ ठरली.
क्रेजिकोव्हाने शनिवारी अंतिम फेरीत पाओलिनीचा ६-२, २-६, ६-४ असा पराभव करून कारकिर्दीतील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विजेतेपदावर मोहोर उमटवली. यासह विम्बल्डनच्या ओपन एरामध्ये महिलांचे विजेतेपद पटकावणारी चेक प्रजासत्ताकची क्रेजिकोव्हा ही चौथी टेनिसपटू ठरली आहे.
तिच्या आधी, तिची एकेकाळची मार्गदर्शक याना नोवोत्ना, पेट्रा क्विटोवा आणि गेल्या वर्षीची चॅम्पियन मार्केटा वोंड्रोसोवा यांनी हे विजेतेपद पटकावले होते. क्रेजिकोव्हा आता एकेरी आणि दुहेरी या दोन्ही प्रकारात विम्बल्डन चॅम्पियन ठरली आहे.पाओलिनीला एकेरी मेजर जिंकणारी पहिली इटालियन पुरुष किंवा महिला टेनिसपटू बनण्याची अभूतपूर्व संधी होती, पण तसे झाले नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पाओलिनीला जगातील अव्वल टेनिसपटू इगा स्विटेककडून पराभव पत्करावा लागला होता, आणि विम्बल्डनध्येही पराभवाची पुनरावृत्ती ती टाळू शकली नाही. पाओलिनीला सामन्यात क्रेजिकोव्हाची सर्विस भेदता आली नसली तरी तिने केलेला संघर्ष उल्लेखनिय होता. असे असले तरी जास्मिन विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारी पहिली इटालियन महिला ठरली आहे.
सामन्याच्या सुरुवातील क्रेजिकोवाने जोरदार आक्रमण करताना पहिला सेट ६-२ असा जिंकला. परंतू दुसऱ्या सेटमध्ये जास्मिनने कडवा प्रतिकार करत ६-२ अशी बाजी मारली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये मात्र पुन्हा क्रेजिकोवाने आक्रमण करत सामन्यासह जेतेपदावर आपले नाव कोरले.
पुरुषामध्ये जोकोविच- अल्कारेझमध्ये अंतिम लढत
विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांचा निर्णय झाला आहे. पुरुष एकेरीत गतविजेता कार्लोस अल्कारेझचा सामना सात वेळचा चॅम्पियन नोवाक जोकोविचशी होणार आहे. या ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या लढतीत दोघेही सलग दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. रविवारी लंडनमधील सेंटर कोर्टवर संध्याकाळी 6.30 वाजता हा अंतिम सामना खेळवला जाईल.
गेल्या वर्षी अल्कारेझने स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचचा पराभव करून पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत-3 खेळाडू अल्कारेझने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असलेल्या डॅनिल मेदवेदेवचा 6-7, 6-3, 6-4, 6-4 असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जोकोविचने इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा 6-4, 7-6, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली.





