Wimbledon Open 2024 : कोण ठरणार विम्बल्डनची ‘नवी’राणी? पाओलिनी आणि क्रेजिकोव्हामध्ये आज रंगणार अंतिम लढत…

Wimbledon 2024 Women’s Final (Barbora Krejcikova vs JasminePaolini) : इटलीची जास्मिन पाओलिनी आणि चेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेजिकोव्हा या दोन्ही अव्वल टेनिसपटूंनी विम्बल्डन या मानाच्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारत, ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. याचाच अर्थ असा की, या दोघींपैकी कोणीही जिंकले तरी विम्बल्डनला आता महिला एकेरीत नवी’राणी’ अर्थात विजेती मिळणार आहे. हा अंतिम सामना शनिवारी (13 जुलै) पार पडणार आहे.
पाओलिनी ही विम्बल्डनची अंतिम फेरी गाठणारी पहिली इटालियन खेळाडू ठरली आहे. तिने पहिल्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत डोना वेकिचचा 2-6, 6-4, 7-6 असा पराभव केला. हा सामना दोन तास 51 मिनिटे चालला, जो विम्बल्डनमधील सर्वात लांब महिला एकेरी सामनादेखील होता. तर दुसरीकडे, बार्बोराने देखील अन्य उपांत्य फेरीत 2022ची चॅम्पियन एलेना रायबाकिनाचा ३-६,६-३,६-४ असा पराभव करत पहिल्यांदाच स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
विम्बल्डनची अंतिम फेरी गाठून जास्मिनने सेरेना विल्यम्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याच मोसमात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विल्यम्सनंतरची ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. सेरेनाने 2015 आणि 2016 मध्ये फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन
पहिला सेट गमावल्यानंतर पाओलिनीने दुसरा आणि तिसरा सेट जिंकून सामना जिंकला. पहिल्या सेटच्या पहिल्या चार गेममध्ये पाओलिनी आणि डोना वेकिच यांच्यात बरोबरी होती. वेकिचने काही चांगले फटके खेळून पहिला सेट जिंकला. यानंतर पाओलिनीने पुनरागमन केले. दुसऱ्या सेटमध्येही 4-4 अशी बरोबरी झाल्यानंतर त्याने हा सेट 6-4 असा जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये 3-1 आणि 4-3 अशा दोन वेळा ब्रेकने मागे पडल्यानंतर पाओलिनीने पुनरागमन करत सेट 7-6 असा जिंकला.
Wimbledon Open 2024 : रायबाकिनाचा पराभव करत क्रेजिकोव्हाची अंतिम फेरीत धडक…
क्रेजिकोव्हा दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत
बार्बोरा क्रेजिकोव्हा दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिने रायबाकिनाला धूळ चारताना हा परक्रम केला. पहिला सेट 3-6 असा गमावल्यानंतर बार्बोराने बाऊंस बॅक करत दुसरा आणि तिसरा सेट 6-3 आणि 6-4 असा जिंकला. यापूर्वी त्याने 2021 मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते.





