Wimbledon Open 2024 : मेदवेदेवचा पराभव करत अल्काराझची अंतिम फेरीत धडक…

Wimbledon Open 2024 (D. Medvedev vs C. Alcaraz) : कार्लोस अल्काराझने शुक्रवारी पाचव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवचा पराभव करून विम्बल्डन 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत खडतर सुरुवात करूनही, अल्काराझने बाजी मारली आणि विम्बल्डनमध्ये सलग दुसऱ्यादा अंतिम फेरी गाठली.
उपांत्य फेरीचा पहिला सेट गमावल्यानंतर, अल्काराझने पुनरागमन केले आणि 6-7(1), 6-3, 6-4, 6-4 असा विजय मिळवला. रविवारी (14 जुलै) होणाऱ्या अंतिम फेरीत अल्काराझचा सामना नोव्हाक जोकोविच आणि लोरेन्झो मुसेट्टी यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.
दुसरीकडे महिला एकेरी स्पर्धेत इटलीची सातवी मानांकित जास्मिन पाओलिनी आणि चेक प्रजासत्ताकची 31 वी मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हा (Barbora Krejcikova vs Jasmine Paolini) या दोन्ही अव्वल टेनिसपटूंनी विम्बल्डन या मानाच्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारत, ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. महिला विम्बल्डन 2024 स्पर्धेची अंतिम लढत शनिवार (13 जुलै) रंगणार आहे.





