Wimbledon Open 2024 : जोकोविच 37व्यांदा ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत, विजेतेपदाच्या लढतीत आज अल्काराजचे आव्हान…

लंडन – सर्बियाचा माजी नंबर वन टेनिसस्टार नोवाक जोकोविचने विम्बल्डनमधील वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅममध्ये आपली चमकदार मोहीम सुरू ठेवली आहे. उपांत्य फेरीत लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करून जोकोविचने पुरुष एकेरीच्या ग्रँडस्लॅम अंतिम फेरीत 37व्यांदा प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत जोकोविचचा सामना गतविजेता स्पेनच्या कार्लोस अल्काराजशी (Carlos Alcaraz vs Novak Djokovic) होणार आहे. रविवारी लंडनमधील सेंटर कोर्टवर संध्याकाळी 6.30 वाजता हा अंतिम सामना खेळवला जाईल.
जोकोविच आता स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररशी बरोबरी करण्याच्या जवळ पोहोचला आहे. सध्या खुल्या युगातील फेडरर हा एकमेव खेळाडू आहे ज्याने आठ वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. जोकोविच सात वेळा या स्पर्धेचा चॅम्पियन बनला आहे, तर पीट सॅम्प्रासकडेही विम्बल्डन विजेतेपदांची संख्या तेवढीच आहे.
जर 37 वर्षीय जोकोविच अल्काराझचे आव्हान मोडून काढण्यात यशस्वी ठरला तर तो या स्पर्धेतील सर्वांत वरिष्ठ चॅम्पियन बनेल. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून बरा होऊन विम्बल्डनमध्ये आलेला जोकोविचने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यात तो यशस्वी ठरला आहे. जोकोविचने गेल्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पाच सेटच्या लढतीत अल्कारेझला पराभूत केले होते. जोकोविच आणि अल्कारेझ यांच्यातील आकडेवारीत सध्या सर्बियन खेळाडूचा वरचष्मा आहे, पण स्पेनच्या या युवा खेळाडूने दोन वेळा जोकोविचला चकित केले आहे.
जोकोविचची विक्रमी ग्रँडस्लॅम फायनल
सर्वाधिक ग्रँडस्लॅम फायनल खेळण्याचा विक्रम जोकोविचच्या नावावर आहे. जोकोविचने ३७व्यांदा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा सामना गाठला आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक ग्रँडस्लॅम खेळण्याच्या बाबतीत, रॉजर फेडरर आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत 31 वेळा ग्रँडस्लॅम फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर स्पेनच्या राफेल नदालने 30 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे सामने खेळले आहेत.
जोकोविचचे ग्रँडस्लॅम
ऑस्ट्रेलियन ओपन- 10
फेंच ओपन- ०३
विम्बल्डन- ०७
अमेरिका ओपन- ०४
एकूण- २४
Wimbledon Open 2024 : मेदवेदेवचा पराभव करत अल्काराझची अंतिम फेरीत धडक…
जोकोविचचा ‘राजा’
नोवाक जोकोविच(सर्बिया)-२४
राफेल नदाल(स्पेन)- २२
रॉजर फेडरर(स्वित्झर्लंड)- २०
पीट सॅम्प्रास(अमेरिका)-१४





