Wimbledon Open 2024 : रायबाकिनाचा पराभव करत क्रेजिकोव्हाची अंतिम फेरीत धडक…

Wimbledon Open 2024 (Barbora Krejcikova vs ElenaRybakina) : बार्बोरा क्रेजिकोव्हाने गुरुवारी सेंट्रल कोर्टवर एलेना रायबाकिनाविरुद्ध पुनरागमन करत तिच्या पहिल्या विम्बल्डन अंतिम फेरीत प्रवेश केला. क्रेज्सिकोव्हाने रायबाकिनाचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना शनिवारी (13 जुलै) जास्मिन पाओलिनीशी होणार आहे.
क्रेजिकोव्हाने फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की मागे टाकत या स्पर्धेत चौथ्या मानांकित खेळाडूला पराभूत करून शानदार खेळ केला. 31व्या मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हाने उपांत्य फेरीत पहिला सेट गमावला होता, पण तिने शानदार पुनरागमन करत सामना जिंकला.
तत्पूर्वी, जास्मिन पाओलिनीने डोना वेकिचचा पराभव करून विम्बल्डनच्या महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. पाओलिनीने पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन करत उपांत्य फेरीचा सामना जिंकला. तिने डोना वेकिचचा 2-6, 6-4, 7-6 (10-8) असा पराभव केला.
दरम्यान, विम्बल्डनमधील पुरुष एकेरीची उपांत्य फेरी शुक्रवारी रंगणार आहे. या सामन्यांमध्ये दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोविचचा सामना 25व्या मानांकित मुसेट्टीशी होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात तिसरा मानांकित कार्लोस अल्काराझचा सामना पाचव्या मानांकित दिमित्री मेदवेदेवशी होणार आहे.





