Wimbledon Open 2024 : गतविजेत्या कार्लोस अल्काराझची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

Wimbledon Open 2024 : गतविजेता कार्लोस अल्काराझने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवत वर्षातील तिसरे ग्रँड स्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यासह अल्काराझने विजेतेपद वाचवण्याच्या मोहिमेत एक पाऊल पुढे टाकले आहे. अल्काराझने सेंटर कोर्टवर उगो हम्बर्टवर 6-3, 6-4, 1-6, 7-5 असा सहज विजय नोंदवला.
अल्काराज या सामन्यानंतर म्हणाला, ‘मला वाटते की मी या सामन्यात चांगला खेळलो आणि मी खूप उच्च पातळीवर खेळलो.’ आता उपांत्य फेरीत गाठण्यासाठी अल्काराझचा सामना अमेरिकेच्या टॉमी पॉलशी होणार आहे, ज्याने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या लढतीत स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता अगुटचा पराभव केला. पॉल पहिल्यांदाच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. हा सामना मंगळवारी (9 जुलै) होणार आहे.
अल्काराझ एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीत पोहोचण्याची ही नववी वेळ आहे. यासह, अल्काराझ सर्वात जास्त वेळा एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा संयुक्तपणे तिसरा स्पॅनिश खेळाडू ठरला आहे.
Wimbledon Open 2024 : नागलने दुहेरीतही केली निराशा, पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की…
या यादीत 22 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल हा आघाडीवर आहे, ज्याने 47 वेळा मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याच्यानंतर म्हणजेच दुसऱ्या स्थानावर डेव्हिड फेरर आहे ज्याने 17 वेळा अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे फेररने कारकिर्दीत एकही ग्रँड स्लॅम जिंकलेला नाही.





