China Masters 2024 : भारताचा स्टार शटलर ‘लक्ष्य सेन’ची उपांत्यपूर्व फेरीत धडक…

China Masters 2024 : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने गुरुवारी येथे सरळ गेममध्ये विजय मिळवत चीन मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक हुकलेल्या लक्ष्यने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रासमुस गेमकेचा 46 मिनिटांत 21-16, 21-18 असा पराभव केला. पुढील फेरीत लक्ष्याचा सामना जपानचा ताकुमा ओबायाशी आणि तिसरा मानांकित डेन्मार्कचा अँडर अँटोनसेन यांच्यातील विजेत्याशी होईल.
गेमकेविरुद्ध लक्ष्यने आक्रमक सुरुवात करत पहिल्या गेममध्ये वर्चस्व राखले. त्याने नेटवर चमकदार कामगिरी करत गुण मिळवले आणि पहिला गेम जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूला जास्त संघर्ष करावा लागला नाही. दुसऱ्या गेममध्ये चुरशीची स्पर्धा झाली. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी 10 गुणांसाठी कडवी झुंज दिली.
China Masters 2024 : सिंधू पाठोपाठ अनुपमा अन् मालविकाचेही आव्हान संपुष्टात….
लक्ष्यने ब्रेकमध्ये 11-10 अशी किंचित आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्यने आपल्या दमदार स्मॅशने 14-12 अशी आघाडी घेतली आणि नंतर प्रतिस्पर्ध्याच्या सोप्या चुकांचा फायदा घेत स्कोअर 20-16 असा केला. गेमकेने दोन मॅच पॉइंट वाचवले पण लक्ष्यने दमदार स्मॅशने गुण जमा करत सामना जिंकला.





