यावर बोलण्याचं धाडस दाखवणार का ? अयोध्या पोळ यांच्यावरील शाईफेक प्रकरणी अमोल मिटकरींचा चित्रा वाघ यांना सवाल

मुंबई – ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल रात्री उशिरा ठाण्यात घडल्याचे समोर आले. एका खासगी कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांनाही बोलवण्यात आलं होतं. यावेळी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता या प्रकरणावरून चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधत काही सवाल उपस्थित केले आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ राज्यातील महिलांच्या प्रश्ना संबंधी आक्रमक भूमिका मांडत असतात.अयोध्या पोळ यांच्यावर झालेल्या शाई फेकीनंतर अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्याताई पौळ पाटील यांच्यावर काल कळवा परिसरात झालेली शाईफेक, सत्ताधारी राजकारणासाठी किती खालची पातळी गाठू शकतात हे दर्शविते.चित्राताई यावर काही बोलण्याचं धाडस दाखवतील का ? की नेहमीप्रमाणे सोयीचं राजकारण करतील?” असा सवाल मिटकरींनी यावेळी उपस्थित केला आहे.
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सोशल मीडिया प्रमुख अयोध्याताई पौळ पाटील यांच्यावर काल कळवा परिसरात झालेली शाईफेक, सत्ताधारी राजकारणासाठी किती खालची पातळी गाठू शकतात हे दर्शविते.चित्राताई यावर काही बोलण्याचं धाडस दाखवतील का ? की नेहमीप्रमाणे सोयीचं राजकारण करतील?@ChitraKWagh
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 17, 2023
काय घडलं नेमकं पोळ यांच्यासोबत
ठाकरे गटाच्या समाजमाध्यम राज्य समन्वयक अयोध्या पौळ या ट्विटर या माध्यमातून विरोधकांवर टीका करत असतात. शुक्रवारी खासगी कार्यक्रम कळवा येथील जय भीम नगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी अयोध्या या आल्या होत्या. त्यावेळी काही महिलांनी त्यांना घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली.
शाई फेकीनंतर अयोध्या पोळ यांची प्रतिक्रिया
“मी अन माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो अन माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होत असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे अन मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार अन लाखो शिवसैनिक माझ्या सोबत होते. त्या सर्वानीच मला लढण्याची ताकद दिली असल्याचे पोळ यांनी म्हंटले.





