संभाजी ब्रिगेडच्या नावावरून वाद पेटणार? शिवधर्म फाउंडेशनचा आंदोलनाचा इशारा

Deepak Kate | अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारतवासीयांसाठी आदर्श आहेत. महाराष्ट्रात मात्र, ‘संभाजी ब्रिगेड’ छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान करत आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ने नावात बदल करून ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ असे करावे किंवा संघटनेचे नाव बदलावे अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी दिला. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अनेकदा पत्रव्यवहार करून, भेटी घेऊन पाठपुरावा केला आहे. मात्र, संघटनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे काटे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे व अन्य पदाधिकारी एकीकडे संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्याला कठोर शासन करण्याची, तसेच महाराष्ट्रात राहू न देण्याची भाषा करतात. मात्र, स्वतःच्या संघटनेच्या नावात महाराजांचा एकेरी उल्लेख सर्रासपणे करतात. त्यात बदल करण्याची मागणी केली, तर त्याकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप काटे यांनी केला आहे.
यामुळे नावावरुन मोठा वादा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी, तसेच अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी असल्याचे काटे यावेळी बोलताना म्हणाले. संघटनेच्या नावात धर्मरक्षक संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे. संघटनेने नावात बदल केला नाही तर संघटनेची व पक्षाची नोंदणी तात्काळ रद्द करावी, असे देखील ते म्हणाले आहेत. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या ३ एप्रिल २००२५ पासून राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.





