Uddhav Thackeray : कोकणात ठाकरे गटाला नवसंजीवनी मिळणार? बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन

रत्नागिरी : कोकणात उद्धव ठाकरे (शिवसेना) पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१९ मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. आज ८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांच्या समवेत सहदेव बेटकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मुंबईत उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते सहदेव बेटकर हे काँग्रेस नेते असून त्यांनी आता उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी खासदार संजय राऊत तसेच विनायक राऊत उपस्थित होते. मातोश्री माझी ९२ सालापासून आहे. ९२ ला मोठ्या साहेबांच दर्शन घेतलेलं. रमेश मोरेंच्या आशिर्वादाने मी मातोश्रीवर आलेलो. आज मी परत माझ्या घरात आलेलो आहे, असं सहदेव बेटकर म्हणाले.
सहदेव तुमचा आवाज तळ कोकणापर्यं गेला असेल : उद्धव ठाकरे
सहदेव एवढया जोरात बोलला की, हा आवाज तळ कोकणापर्यं गेला असेल. मला आणखी काही बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. दत्ता आज तुमचा वाढदिवस आहे, तुमचं खरच कौतुक आहे, स्वत:चा वाढदिवस असताना शिवसेना वाढवण्यासाठी इथे आलात. दत्तासारखे अनेक शिवसैनिक आज राज्यभर पसरले आहेत. त्यांनी आतापर्यंत शिवसेना वाढवली, शिवसेवना वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कोकणातलं युद्ध आपण जिंकणारच : संजय राऊत
आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते, शिवसैनिक आहात. सहदेवाच्या येण्याने नवीन कुरुक्षेत्रावर महायुद्ध सुरु झालेलं आहे. हे कोकणातलं युद्ध आपण जिंकणारच आहोत, अनेकांनी सहदेवाना सांगितल आहे हे शेवटचं मैदान, आता मैदान बदलायचं नाही. आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा करुन ते ठेकेदारांच राज्य संपवून टाका, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना इतकच सांगेन कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र. कोकणातील एक कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी किती कार्यकर्ते, शिवसैनिक आलेत. सगळं जागेवर आहे, बाहेर फक्त हवा आहे. बाहेरच्या हवेची दिशा बदलताना मला दिसतेय, आपण फक्त कोकणात एक दौरा करा. कोकणच्या भूमीवर एक पाऊल ठेवा, पहा कशी दाणादाण उडते, असं संजय राऊत म्हणाले.
सहदेव बेटकर यांची राजकीय कारकीर्द
मूळचे शिवसैनिक असलेले सहदेव बेटकर यांनी मुंबईतून समाजिक आणि राजकीय कार्यक्रमाला सुरुवात केली होती. बेटकर यांनी संगमेश्वर-धामापूर जिल्हा परिषद गटातून रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. बेटकर यांचे काम पाहून शिवसेनेने त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती केले होते.
२०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती. २०१९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत ५२ हजार मते मिळवली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सहदेव बेटकरांचा येथील गावांशी, वाड्यांशी, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क होता. गुहागर मतदारसंघातून मागील निवडणुकीत शिवसेनेने भास्कर जाधव यांना तिकिट दिले हेाते. त्या वेळी सहदेव बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून गुहागर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचा त्या निवडणुकीत अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभव झाला होता.





