पुणेः ससून रुग्णालयावरचा ताण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहर आणि जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावार रुग्ण ससून रुग्णालयात उचारांसाठी दाखल होतात. यामुळे पुण्यात अत्याधुनिक पद्धतीचे नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. राज्य सरकारची या प्रस्तावर मंजुरी मिळताच पुण्यात नवीन सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे राहणार आहे.
या रुग्णालयामुळे रुग्णांना ताटळत थांबवे लागणार नाही. त्यांना तातडीने उपचार मिळणार आहेत. ससून सर्वेापचार रुग्णालयावरील ताण हा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अनेकदा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईना ताटकळत येथे उभे राहावे लागते. सध्या विशिष्ट आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ससूनमधील इन्फोसिस इमारतीत सुपर स्पेशालिटी सुविधा आहे. मात्र, ही सुविधा अपुरी पडू लागल्याने स्वतंत्र रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या सुविधा नव्या रुग्णालयात असणार
रुग्णालयातील खाटांची संख्या २५० इतकी असेल.
स्वतंत्र आयसीयु विभाग आणि त्यामध्ये ५० खाटांची संख्या असणार आहे.
मेंदूविकार, मूत्रविकार, हृदविकार आणि प्लॅास्टिक सर्जरी विभाग देखील असणार आहेत.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात मेंदूविकार, हृदयविकार, मूत्रविकार आणि प्लास्टिक शस्त्रक्रिया या विषयांचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्गही सुपर स्पेशालिटी रुग्णालयात घेतले जातील.
पुण्यात कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात कॅन्सर रुग्णालय सुरू केले आहे. सुलभ दरात आणि तात्काळ उपचार या रुग्णालयात रुग्णांना दिले जातात. यामुळे पुण्यात देखील अत्याधुनिक पद्धतीचे कॅन्सर रुग्णालय असावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. यामुळे आता कॅन्सर रुग्णालयाच्या जागेच्या प्रस्तावासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत जागेवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कॅन्सर रुग्णालयाचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.