गुवाहाटी : भाजपची सत्ता असणाऱ्या आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होईल. ती निवडणूक लढवण्याच्या संदर्भात कॉंग्रेसने एकला चलो रे चे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्या राज्यात विरोधक विखुरण्याची शक्यता बळावली आहे. निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्याने आसाममध्ये भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. विशेष म्हणजे, त्यासाठी काही नामांकित नागरिकांनी पुढाकार घेतला. त्यातून शनिवारी गुवाहाटीलगत असणाऱ्या एका रिसॉर्टवर विरोधी पक्षांची बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये कॉंग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष भुपेनकुमार बोरा आणि खासदार प्रद्युत बोरदोलोई सहभागी झाले. विरोधकांच्या बैठकीत काही मुद्द्यांवरून तीव्र मतभेद झाल्याचे समजते. त्यामुळे नाराज झालेले बोरदोलोई बैठकीतून बाहेर पडले. त्या बैठकीत डावे पक्ष आणि इतर काही पक्ष सहभागी झाले होते. बोरदोलोई यांनी बैठकीतून बाहेर पडण्याचे कारण सांगणे टाळले. तर, पूर्ण वेळ बैठकीत उपस्थित राहिलेल्या बोरा यांनी नेमकी काय चर्चा झाली त्याविषयी मौन पाळणे पसंत केले. मात्र, रविवारी बोरा यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट टाकली. त्यामध्ये त्यांनी गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या एकला चलो रे गीताचा संदर्भ दिला. त्यामुळे कॉंग्रेस स्वबळावर लढण्याच्या मुडमध्ये असल्याचे सूचित झाले. त्यातून तूर्त तरी आसाममध्ये विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत अडथळा निर्माण झाल्याचे मानले जात आहे.