Aaditya Thackeray : सरकार रुग्णालय ताब्यात घेणार का?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई : माणसाच्या जाती-धर्माच्या पलिकडेही माणुसकी नावाची गोष्ट असते. पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो प्रकार घडला तो माणुसकीला काळीमा फासणारा आहे. त्यामुळे आरोपींची जात-धर्म न पाहता त्यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी. रुग्णाकडे 10 लाखांची मागणी करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर मनपा आणि इन्कम टॅक्स विभाग काय कारवाई करणार हे स्पष्ट करावे. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय राज्य सरकार ताब्यात घेणार का? असे सवाल उपस्थित आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे स्वतंत्र वैद्यकीय कक्ष आहेत. पण त्याचा काय उपयोग? मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाऊनही त्या रुग्णालयात महिलेला दाखल करुन घेतले नाही. या रुग्णालयातील प्रशासन इतकं मग्रुर का आहे याचं उत्तर सरकारने द्यावे. या हॉस्पिटलचे डॅश बोर्ड आहे की नाही याची माहिती सरकारने द्यावी. तसेच राज्य सरकार हे रुग्णालय ताब्यात घेणार का? हेदेखील स्पष्ट करावे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णालयाच्या प्रशासनाला अनेक फोन गेले. पण कोणाचाही फोन येऊ दे, दहा लाख भरल्याशिवाय ॲडमिट करुन द्यायचे नाही असा आदेश देण्यात आला. हे कृत्य माणूसकीला काळीमा फासणारं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या या प्रकरणाची सखोल तपासणी व्हावी आणि रुग्णालयावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.





