Uddhav Thackeray : मतं चोरली जाऊ शकतात जनता नाही; उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, देशातील तरुण मुलांनी आज एक सुवर्णपान लिहिले आहे. जात, पात आणि धर्म बाजूला ठेवून देशातील तरुण पिढी अन्यायाविरुद्ध एकत्र आली आहे, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.

Uddhav Thackeray : केंद्र सरकारला नमवणाऱ्या देशातील तरुणाईचे मी अभिनंदन करतो. मुंबईत जमलेली ही गर्दी कोणतीही निवडणूक झाल्यानंतरची नाही, तर अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकल्यानंतरची आहे. हे आंदोलन हुकुमशाहीविरुद्धच्या एका मोठ्या लढ्याची सुरुवात असून मतं चोरता येतात, पण जनता नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील भव्य सभेत ते बोलत होते. या सभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेच्या सुरुवातीला नीट पेपरफुटी प्रकरणामुळे निराश होऊन जीवन संपवलेल्या २१ विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, देशातील तरुण मुलांनी आज एक सुवर्णपान लिहिले आहे. जात, पात आणि धर्म बाजूला ठेवून देशातील तरुण पिढी अन्यायाविरुद्ध एकत्र आली आहे, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. आज देशातील तरुण जागा झाला आहे आणि हेच चित्र देशाच्या भविष्यासाठी आशादायक आहे.
विद्यार्थ्यांचे हे आंदोलन एका मोठ्या लढ्याची सुरुवात आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे. या संघर्षात जातपात, धर्म विसरुन सहभागी व्हा. मी भारतीय आहे, ही जाणीव ठेवा. एका झुरळाने हुकूमशहाला नमवले आहे. मोदीजी आतातरी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री त्यांचे काम सोडून इतर पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना आतातरी म्हणा देशाचे काम करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन महागाई, घसरणारा रुपया यावर एक शब्द बोलत नाहीत. फक्त पेपरफुटीचे फायदे सांगत आहेत. राजनाथ सिंह हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत, पण आता ते धर्मेंद्र प्रधानांचे रक्षण करत होते. आपले खड्डामंत्री माफ करा, रस्तेमंत्री नितीन गडकरी हे इथेनॉलवर बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
देशाला कमकुवत करू देऊ नका
मला मोदींना सांगायचे आहे की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या. त्यापेक्षा जास्त यातना नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या असतील. ही ठिणगी आता जागती ठेवणे आपल्या सगळ्यांचे काम आहे.
आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करु नका. तुम्ही जनतेची ताकद दाखवून दिली आहे. या देशाला पुन्हा कोणीही कमकुवत करू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी (Uddhav Thackeray) तरुणाईला केले.






