Naigaon Area: नायगाव परिसरात महामार्गावरील अतिक्रमणावर कारवाई
Naigaon Area: अनेक वेळा सुचना देऊनही अतिक्रमण स्वेच्छेने हटवले नाही.

कामशेत – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत नायगाव येथे करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मंगळवारी (दि. २१) कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त पथकाने या मोहिमेत महामार्गाच्या जागेवर उभारण्यात आलेले अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटवले.
एमएसआरडीसीने यापूर्वीही या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली होती. मात्र संबंधित व्यावसायिकाने पुन्हा त्याच जागेवर अनधिकृत बांधकाम करून व्यवसाय सुरू केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. याबाबत अनेक वेळा सुचना देऊनही अतिक्रमण स्वेच्छेने हटवले नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान कामशेत शहरालगतच्या पुणे-मुंबई महामार्गावरही अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी महामार्गाच्या हद्दीत अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केल्याचे दिसून येत आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नायगावप्रमाणेच कामशेत परिसरातील तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर समान कारवाई करून महामार्ग अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
‘नायगाव हद्दीतील अतिक्रमण यापूर्वी २५ मे रोजी हटविण्यात आले होते. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने पुन्हा शासनाच्या जागेवर अतिक्रमण केले. त्यामुळे नियमानुसार ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी शासनाच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये, अन्यथा अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल.’- राहुल पवार, डेप्युटी इंजिनिअर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
Nana Kate : धरण भरले, पाणी कपात रद्द करा; माजी विरोधी पक्ष नेते नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी





