पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाच्याला अटक

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाच्याला अटक ली असल्याचे पंजाब प्रांताच्या पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. पाकिस्तानमध्ये ९ मे २०२३ रोजी झालेल्या दंगल प्रकरणी शहरेझ खान यांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. शहरेझ खान यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ पक्षाच्यावतीने करण्यात आला होता. त्यावर पंजाब पोलिसांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.
शहरेझ खान ९ मे रोजीच्या दंगल प्रकरणी वॉन्टेड होते. त्याच आरोपाखाली त्यांना त्यांच्या घरूनच अटक करण्यात आली असून आजच त्यांना न्यायालयामोर हजर करण्यात येणार आहे, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जे देशविरोधी कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्याबाबतीत कोणताही आळशीपणा करून चालणार नाही, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
साध्या कपड्यातल्या पोलिंसांनी काल रात्री इम्रान खान यांच्या भगिनी अलीमा खानूम यांच्या घरावर हल्ला केला. तेथील नोकरांना मारहाण केली आणि अलीमा खानूम यांचे पुत्र, इम्रान खान यांचे भाचे शहरेझ खान यांचे अपहरण केले. शहरेझ खान यांचा राजकारणाशी काहीही संबंध नसताना त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा इम्रान खान यांचे निकटचे सहकारी झुल्फी बोखारी यांनी गुरुवारी रात्री सांगितले. क्रूर फॅसिझमची ही नवीन खालावलेली पातळी आहे. या भयानक, लज्जास्पद कृत्याचा आम्ही निषेध आहे, असे ते म्हणाले.
शहरेझ खान हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू असून त्यांच्या घराचे दरवाजे तोडून बेडरूममधून त्यांचे अपहरण करण्यात आले आहे. शेहराझ खान यांच्या दोन मुलांसमोरच त्यांना मारहाण करण्यात आली असेही पीटीआयने म्हटले आहे. पीटीआयचे नेते आणि खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री आली आमिम गंदापूर यांनीही शेहरेझ खान यांच्या अटकेवर टीका केली आहे.
अलीमा खानून या पाकिस्तानमधील लष्करावर नेहमीच कडवट टीका करत असतात. जर तुरुंगात असताना आपले काही बरेवाईट झाल्यास पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांना जबाबदार धरण्यात यावे, असे इम्रान खान यांनीच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचे आलीमा खानूम म्हणाल्या होत्या. इम्रान खान यांना २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात अटक करण्यात आली असून, तेंव्हापासून ते तुरुंगातच आहेत.





