Pune News | अजित पवारांच्या गटाची कोंडी; प्रभाग रचनेत भाजपचा मजबूत डाव

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पालिकेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा सर्वाधिक फटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला आहे. निवडणुकीची घोषणा होताच भाजप पदाधिकाऱ्यांनी २०१७ ची प्रभाग रचना कायम ठेवावी आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी स्वतंत्र प्रभाग करावेत, अशी भूमिका घेतली होती.
प्रत्यक्षात समाविष्ट गावांसाठी स्वतंत्र प्रभाग रचना न करता १९९७-९८ मध्ये समाविष्ट झालेल्या जुन्या २३ गावांच्या प्रभागांनाच ही गावे जोडली आहेत. त्यामुळे त्याचा फटका थेट उपनगरांमध्ये आणि या गावांमध्ये वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला बसला आहे.
२०१७ ची प्रभाग रचना कायम ठेवून नवीन गावांचे स्वतंत्र प्रभाग करण्याची मागणी भाजपने केली होती. यामुळे उपनगरे आणि समाविष्ट गावांची सदस्यसंख्या कमी झाली आहे. या भागात राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्राबल्य होते. त्याचवेळी, मध्यवर्ती पेठा, कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर या भागांत मतदार अनुकूल असल्याने भाजपने या ठिकाणी छोट्या प्रभागांची संख्या वाढविण्यावर भर दिला.
त्यामुळे आता महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येण्याची दाट शक्यता आहे. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र, पक्षात फूट पडल्याने राष्ट्रवादी दोन गटात विभागली असून, सर्वाधिक माजी नगरसेवक अजित पवारांच्या गटात आहेत. मात्र, भाजपने प्रभाग रचना करताना राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले प्रभागच मोठे केले आहेत.
बाणेर-बालेवाडी, हडपसर, खराडी, कोंढवा, वारजे, धनकवडी, शिवाजीनगर या भागात प्रभाग रचना करताना काही प्रभाग मोठे करण्यात आले असून, गावांमधील राष्ट्रवादीचे इच्छुक आमनेसामने येतील, याची खबरदारी घेण्यात आली आहे.
त्यात विमाननगर प्रभाग लोहगावपर्यंत, बाणेर-बालेवाडी प्रभाग कोथरूडपर्यंत, मुंढवा प्रभाग मांजरीपर्यंत, कोरेगाव पार्क प्रभाग मगरपट्टा सिटीपर्यंत आणि वारजे प्रभाग शिवणेपर्यंत जोडला आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांची कोंडी झाली आहे.





