हॉलिवूड अभिनेत्याचं रिअल लाइफ धाडस; चढला जगातील सर्वात उंच ‘बुर्ज खलिफा’च्या शिखरावर

दुबई – हॉलिवूड अभिनेता विल स्मिथचे जगभर लाखो फॅन्स आहेत. आजवर अनेकांनी त्याला हॉलिवूड सिनेमांमध्ये ऍक्शन आणि स्टंट करताना पाहिले आहे. पण त्याने आता आणखी एक रिअल लाइफ धाडस केले आहे. जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या ‘बुर्ज खलिफा’च्या शिखरावर विल स्मिथ उभा असल्याचे दिसले. यूट्यूब शो बेस्ट शेप ऑफ माय लाइफच्या एक एपिसोडसाठी विल बुर्ज खलिफा इमारतीच्या शिखरावर पोहोचला होता.
ड्रोनच्या मदतीने विलचे काही फोटो आणि व्हिडिओ काढण्यात आले आहेत. सोशल मीडियावर विल स्मिथचे जबरदस्त फोटो पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले. बुर्ज खलिफा ही इमारत तब्बल 160 मजली असून 2,722 फूट उंच आहे. आपण हा व्हिडिओ पहिला तर यामध्ये विल स्मिथ बुर्ज खलिफाच्या शिखरावर हात पसरून उभा आहे.
यावेळी तो हसताना दिसला. तसेच तो इमारतीच्या वरच्या बाजूला बसलेलाही दिसतो. खास या शूटिंगसाठी विल स्मिथ लॉस एंजेलिस येथून दुबईला आला होता. विल स्मिथने हॉलिवूडमधील ‘मेन इन ब्लॅक, स्टुडंट ऑफ द इयर 2, बॅड बॉईज सिरीज, हॅंकॉक, आफ्टर अर्थ आणि फोकस’ सारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे.





