Israel Iran Attack: इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर बुर्ज खलीफा रिकामा; UAE सह सात अमेरिकी तळांवर हल्ले
Israel Iran Attack: तज्ञांच्या मते हा संघर्ष UAE च्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका ठरू शकतो, कारण देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यटन आणि परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे.

Israel Iran Attack: अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील सात अमेरिकी लष्करी तळांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली. संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेने क्षेपणास्त्रे झेपावताच जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलीफा सावधगिरी म्हणून तातडीने रिकामी करण्यात आली.
बुर्ज खलीफा रिकामा, दुबईत स्फोटांचे आवाज
इराणने UAE मधील अल धाफ्रा हवाई तळाला लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. या तळावर अमेरिकी सैन्य तैनात आहे. अबुधाबी आणि दुबईत मोठे स्फोट ऐकू आले. हे स्फोट क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे झाले की हवाई संरक्षण यंत्रणेने क्षेपणास्त्रे रोखल्यामुळे, हे अधिकाऱ्यांनी तातडीने स्पष्ट केले नाही.
सात अमेरिकी तळांवर हल्ले
इराणच्या फार्स वृत्तसंस्थेनुसार UAE मधील अल धाफ्रासह कतारचा अल उदैद हवाई तळ, कुवेतचा अल सालेम हवाई तळ आणि बहरीनमधील अमेरिकी फिफ्थ फ्लीट तळावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. UAE ने या हल्ल्याला “भ्याड कृत्य” आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हणत कठोर प्रत्युत्तराचा इशारा दिला. सावधगिरी म्हणून UAE ने आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे.
विमानसेवा ठप्प
लुफ्थान्सा, केएलएम, एअर फ्रान्स आणि एअर इंडियासह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी दुबई, अबुधाबीसह मध्यपूर्वेतील उड्डाणे रद्द केली आहेत. तज्ञांच्या मते हा संघर्ष UAE च्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका ठरू शकतो, कारण देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्यटन आणि परकीय गुंतवणुकीवर अवलंबून आहे.





