शिरोमणी अकाली दलही एनडीएमध्ये परतणार?

नवी दिल्ली – शिरोमणी अकाली दल (एसएडी) या पंजाबमधील दुरावलेल्या मित्रपक्षाच्या संपर्कात भाजप असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये एसएडी परतण्याची शक्यता बळावली आहे.
लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे नवे मित्र जोडण्याबरोबरच जुन्या मित्रांशी पुन्हा जुळवून घेण्याची रणनीती भाजपने अवलंबली आहे. त्यामागे इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीला निष्प्रभ ठरवण्याचेही उद्दिष्ट असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष (जेडीयू) इंडियामधून बाहेर पडून पुन्हा एनडीएत सहभागी झाला. त्यामुळे सुखावलेल्या भाजपने एसएडीलाही पुन्हा साथीला घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
भाजप आणि एसएडीमध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली. एसएडी आणि भाजप हे पंजाबमध्ये प्रदीर्घ काळ मित्रपक्षांच्या भूमिकेत राहिले.
मात्र, केंद्रीय कृषि कायद्यांवरून त्यांच्यात बिनसले. त्या कायद्यांना विरोध दर्शवत एसएडी सप्टेंबर २०२० मध्ये एनडीएमधून बाहेर पडला.
दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर मोदी सरकारने ते कायदे मागे घेतले. आता संबंधित कायदे अस्तित्वात नसल्याने एसएडीला पुन्हा एनडीएमध्ये प्रवेश करण्यात कुठली अडचण नसल्याचे मानले जाते.





