Shahaji Bapu Patil : शहाजी बापू पाटलांना मिळणार मोठी जबाबदारी? शिंदेसेनेच्या मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण
Shahaji Bapu Patil : याच मेळाव्यात भरत गोगावले यांनी राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ होण्याचे संकेत दिले.

Shahaji Bapu Patil : विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे ‘काय झाडी, काय डोंगर’ फेम आमदार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला. सांगोल्यात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या विधानामुळे शहाजी बापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चांना उधाण आले आहे.
शहाजी बापू पाटील धडपडून काम करत आहेत. त्यांच्या कामाचे चीज होणे गरजेचे आहे, असे भरत गोगावले यांनी जाहीर सभेत म्हटले. त्यांच्या या विधानानंतर शहाजी बापूंच्या कमबॅकबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
याच मेळाव्यात भरत गोगावले यांनी राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ होण्याचे संकेत दिले. “एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात, ते कुणाला कळत नाही. लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही, नाहीतर मीडिया बातम्या करेल,” असे ते म्हणाले.
त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली आहे. सांगोला येथे झालेल्या या शिवसेना मेळाव्याला मंत्री योगेश कदम आणि अभिनेत्री तथा शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, नाशिकमधील कथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल’ या चित्रपटाचीही चर्चा सुरू आहे. या चित्रपटात दिपाली सय्यद मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटावरून वाद निर्माण झालेला असतानाच शिवसेना मेळाव्यात शहाजी बापू पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला.
शहाजी बापू पाटील म्हणाले…
“अशोक खरातवर चित्रीत होत असणाऱ्या ‘महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झाला आहे. अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला आहे,” असा दावा शहाजी बापू पाटील यांनी केला. या दाव्यामुळे शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या राजकीय पुनर्वसनासोबतच ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनाही वेग आला आहे.





