सांगली : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी 50 खोके घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. 50 खोके एकदम ओके अशी घोषणाही त्यावेळी चर्चेत आली होती. आमच्यावर आरोप करणाऱ्यांना देव कधीही माफ करणार नाही, अशी टीका आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरे गटावर केली आहे. तसेच गुवाहटीला गेलो नसतो तर बहिणींना पैसे मिळाले असते का? असा सवाल त्यांनी केला.
सांगलीतील विटा येथे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यातील कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी शहाजी बापू बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दहा-बारा नेते आहेत. त्यांचे भावी मुख्यंमत्री म्हणून पोस्टर लागतात. पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.