मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काही चुकीचे नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे. महेश मांजरेकर यांना ‘वास्तव में Truth’ या दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. मराष्ट्रातील ठाकरे बंधू अर्थात राज आणि उद्धव एकत्र येणार का? असा सवाल गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जात आहे. सध्याच्या किचकट राजकीय समीकरणात आता राज आणि उद्धव एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली जात असताना आता राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्यातील वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यासाठी एकत्र यायला हरकत नाही, असं राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. महाराष्ट्र संस्कृतीला अशी अभद्र युती मान्य नव्हती राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आहे. पण एक अट ठेवली आहे. असं असताना आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं. ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं, महाराष्ट्र संस्कृतीला अशी अभद्र युती मान्य नव्हती. उद्धव ठाकरेंचे जे सरकार आलं होतं, ते अनैसर्गिक होतं. नैसर्गिक सरकार हे भाजप-सेना युतीचे होते. आता तसेच सरकार आले आहे. तेव्हाही आपलं बहुमत होतं. भाजप आणि सेना एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं. आता तो काळ गेला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राज ठाकरेंची भूमिका जुनीच मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतलेली आहे, ती काही नवीन नाही. यापूर्वीही त्यांनी अशीच भूमिका घेतली होती, आणि त्यावेळी ते म्हणाले होते की, एका हाताने टाळी वाजत नाही, त्यांच्या मागच्या प्रस्तावाचे काय झाले? तोच अनुभव त्यांना याही वेळी येईल’, असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले आहे.