आता पुणे रेल्वे स्टेशन ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ नावाने ओळखणार? भाजप खासदाराच्या मागणीने चर्चेला उधाण

पुणे : देशभरात नामांतराची लाट उसळली असताना पुणे शहराच्या रेल्वे स्थानकाचेही नामांतर करण्याची जोरदार मागणी पुढे आली आहे. भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाला मराठा साम्राज्याचे शिल्पकार श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा ठामपणे मांडला. पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला साजेसे नामांतर करून शहराचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देणे उचित ठरेल
पुणे रेल्वे स्थानकाच्या सध्याच्या स्वरूपात शहराच्या समृद्ध इतिहासाचे प्रतिबिंब दिसत नाही, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. “पुणे हे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब आहे. पण रेल्वे स्थानकावरून शहराचा ऐतिहासिक ठेवा कुठेही जाणवत नाही. भारतातील रेल्वे स्थानके आणि विमानतळे ही त्या शहराच्या इतिहासाशी जोडली जाण्याचा प्रयत्न असतो. पुण्याचा गौरवशाली इतिहास आणि पेशवाईचा वारसा सांगण्यासाठी स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देणे उचित ठरेल,” असे कुलकर्णी म्हणाल्या.
नामांतरामुळे इतिहासाची आठवण नव्या पिढीला मिळेल
पुण्यातील शनिवारवाडा हा पेशवे घराण्याच्या वैभवाची साक्ष देतो. मराठा साम्राज्याच्या विस्तारात बाजीराव पेशव्यांचे योगदान अतुलनीय आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या थोरल्या बाजीरावांनी ४२ लढाया लढल्या आणि एकही हरले नाहीत. त्यांच्या युद्धकौशल्याचे धडे आजही एनडीए आणि सैन्याला दिले जातात,” असे कुलकर्णी यांनी सांगितले. स्थानकाच्या नामांतरामुळे पुण्याच्या या पराक्रमी इतिहासाची आठवण आणि प्रेरणा नव्या पिढीला मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.
गेल्या वर्षी मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलली
देशात सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने नामांतरावर विशेष भर दिला आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे प्रयागराज, महाराष्ट्रातील औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर अशी अनेक उदाहरणे आहेत. गेल्या वर्षी मुंबईतील ७ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. यात मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावरील स्थानकांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर पुणे जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नामांतराची मागणी आता जोर धरू लागली आहे.
पुण्याचा इतिहास आणि पेशवे
पुणे शहर छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे घराण्याच्या इतिहासाशी निगडीत आहे. थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करत हिंदवी स्वराज्याची कीर्ती देशभर पोहोचवली. शनिवारवाडा हे त्यांच्या पराक्रमाचे आणि वैभवाचे प्रतीक आहे. “पुणे ही मराठ्यांची सांस्कृतिक आणि राजकीय राजधानी होती. बाजीराव पेशव्यांचा इतिहास हा पुण्याचा गौरव आहे. त्यांचे नाव रेल्वे स्थानकाला देऊन आपण या इतिहासाचा सन्मान करू शकतो,” असे कुलकर्णी यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी यापूर्वीही अनेकदा लावून धरली आहे. शनिवारवाड्याच्या २९३व्या वर्धापनदिनी (२२ जानेवारी २०२५) थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीनेही ही मागणी करण्यात आली होती. त्या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारपर्यंत ती पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय, पेशवे प्रतिष्ठानचे कुंदनकुमार साठे, पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवे आणि अनेक इतिहास अभ्यासकांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.
पुणे महापालिका, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि ब्राह्मण महासंघाने २०२१ मध्येही बाजीराव पेशव्यांच्या ३३१व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानकाला त्यांचे नाव आणि मेट्रो स्थानकाला नानासाहेब पेशवे यांचे नाव देण्याची मागणी केली होती. आता खासदार कुलकर्णी यांनी पुन्हा ही मागणी लावून धरल्याने याबाबत केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा रेल्वे बैठकीत मांडल्यानंतर आता याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचवण्यासाठी पाठपुरावा करण्याचे नियोजन आहे. पुणे शहराचा गौरवशाली इतिहास आणि पेशवाईचा वारसा जपण्यासाठी ही मागणी पूर्ण होणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.




