Bachchu Kadu : मागे हटणार नाही.! बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन; काय आहेत मागण्या? वाचा…

Bachchu Kadu – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसेच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ रविवारपासून (8 जून) आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते मोझरी येथील समाधीपर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्यभरातून तब्बल 20 हजार शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.
शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मच्छीमारांसाठी आंदोलन करत आहे. यासंदर्भात शासनाकडून आश्वासन मिळाली होती. परंतु त्याची पुर्तता झाली नाही. आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही.
शेतमालांचे भाव पडलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे. घरकुलाचा मुद्दा आहे. मच्छीमारांचा, मेंढपाळ यांचा मुद्दा आहे. अनेक वेळा पत्र देऊनही मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.





