Rahul Gandhi : “बिहारमधील निवडणुकीची चोरी होऊ देणार नाही”; राहुल गांधी यांचा निर्धार
Rahul Gandhi – संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची चोरी सुरू आहे. आता बिहारमध्ये तसे कारस्थान रचले जात आहे. मात्र, बिहारमधील निवडणुकीची चोरी होऊ देणार नाही, असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी व्यक्त केला.
विरोधी पक्षांनी निवडणुकांमधील कथित अनियमितता आणि मतचोरीचा मुद्दा लावून धरला आहे. अशात बिहारमधील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. आगामी निवडणुकीआधी त्या राज्यात मतदार याद्या पडताळणीचे पाऊल उचलण्यात आले.
त्या प्रक्रियेवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आता आणखीच आक्रमक पवित्रा स्वीकारत इंडिया आघाडीचे घटक असणाऱ्या विरोधकांनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रेचा मार्ग अवलंबला आहे.
यात्रेच्या प्रारंभावेळी राहुल यांनी पुन्हा भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र सोडले. निवडणूक आयोग भाजपशी संगनमत करून निवडणुका चोरत असल्याचे संपूर्ण देशाला ठाऊक झाले आहे. संबंधित चोरी कशाप्रकारे घडत आहे ते कॉंग्रेसने दाखवून दिले आहे.
गरीब जनतेकडे केवळ मतांची ताकद आहे. त्या मतांच्या अधिकाराचे आम्ही रक्षण करू. जिथे-जिथे मतांची चोरी होईल; ती आम्ही पकडू आणि जनतेसमोर उघड करू. आमची लढाई राज्यघटना वाचवण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवेळी आमच्या आघाडीने बाजी मारली. त्यानंतर काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्याच विजयाचे भाकीत जनमत चाचण्यांनी केले. प्रत्यक्षात वेगळेच घडले. मोठ्या संख्येने मतदार जोडण्याची जादू त्यासाठी कारणीभूत ठरली. जिथे अतिरिक्त मतदार जोडले गेले; तिथे भाजपचा विजय झाला, असा आरोप त्यांनी केला.
इंडिया आघाडीने अनियमिततांविषयी तक्रार केली. मतदानावेळच्या व्हिडीओ फुटेजचीही मागणी केली. मात्र, निवडणूक आयोगाने नकार दर्शवला. कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघातील लाखभर मतांची चोरी आम्ही निदर्शनास आणून दिली. त्यावरून निवडणूक आयोगाने मला प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले.
माझ्यासारखेच दावे भाजपच्या काही नेत्यांनी केले. मात्र, त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्राची मागणी करण्यात आली नाही. मी मतचोरीची जी आकडेवारी सादर केली ती प्रत्यक्षात निवडणूक आयोगाचीच आकडेवारी आहे, अशी भूमिका राहुल यांनी पुन्हा अधोरेखित केली.
बिहारमधील यात्रेच्या प्रारंभावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतर मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. ती यात्रा बिहारमधील २० जिल्ह्यांमधून सुमारे १ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास करेल. त्या १६ दिवस मार्गक्रमण करणाऱ्या यात्रेत राहुल आणि तेजस्वी सहभागी होणार आहेत.





