पंढरपूर : पंढरपुरातील काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. भगीरथ भालके यांनी पंढरपुरात आपल्या कार्यकर्ते व माजी नगरसेवकांसह शिवसेना मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन सत्कार केला आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजपाच्या प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय नागेश भोसले हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, भगीरथ भालके हे शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले तर पंढरपुरातून काँग्रेसला आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भगीरथ भालके गटाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी यांची पंढरपूर विश्रामगृह येथे बैठक सुरू होती. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले पंढरपूर विश्रामगृहावर पोचल्याचे समजतात भगीरथ भालके यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत गोगावले यांचा सत्कार केला. याबाबत बोलताना भालके यांनी शिवसेनाप्रवेशाबाबतची चर्चा नाकारली आहे. भालके काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा भगीरथ भालके हे गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी थेट दिल्लीमधून भगीरथ भालके यांच्यासाठी तिकीट आणले. मात्र, ही जागा शरद पवार गटाची असल्याने पवार गटाने येथे आरोग्यमंत्र्यांचे पुतणे अनिल दादा सावंत यांना उमेदवारी दिली होती. या तिरंगी लढतीचा फायदा भाजप आमदार समाधान आवताडे यांना झाला होता. सलग दोन पराभवानंतर भालके गट अस्वस्थ असला तरी अद्याप काँग्रेस सोडण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे. असं असलं तरी मंत्री भरत गोगावले आणि भालके यांच्या भेटीने नवीन चर्चा जोर धरत आहेत.