अशोक पवार तगडे आव्हान उभे करणार?

शिरूर- हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी

उरुळी कांचन- शिरुर- हवेली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार आमदार बाबुराव पाचर्णे यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचे समजत आहे. मात्र, अद्यापही राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत माजी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यात उमेदवारीवरून चुरस निर्माण होणार आहे. सध्यस्थितीत अशोक पवार यांनी आमदार पाचर्णे यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

2009 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी आमदार अशोक पवार यांना उमदेवार दिली. पवार हे विजयी झाले. त्यानंतर पाच वर्षांत राजकीय उलथापालथ झाल्यानंतर परिवर्तनाचे वारे वाहू लागले. त्याचा परिणाम हा शिरूर- हवेली मतदारसंघावर दूरगामी परिणाम करणारा ठरला. 2014 मधील निवडणुकीत भाजपचे उमदेवार आमदार बाबुराव पाचर्णे यांनी मैदान मारले. त्यावेळी पाचर्णे यांच्या बाजुला मंगलदास बांदल, निवृत्ती गवारे यांच्यासह हवेली तालुक्‍याने साथ दिली. त्यामुळे पवार यांना पराभव पत्करावा लागला.

पवार यांनी मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे केली होती. त्यामुळे आपण सहज निवडून येऊ, अशी आशा होती. मात्र, निवडणुकीवेळी हवेली तालुक्‍यात वेगळी परिस्थिती निर्माण झाली. गेल्या पाच वर्षांत राजकीय पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यात माजी आमदार पवार यांनी शिरूर तालुक्‍यावर लक्ष केंद्रीत करून जनतेत मिसळले. त्याचा फायदा पवार यांना गेल्या पाच वर्षांत झाला आहे. शिरूर तालुक्‍यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर कब्जा मिळविला. तसेच पवार यांनी विविध प्रश्‍नांवर आंदोलन करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना रिचार्ज केले.

गेल्या पाच वर्षांत आमदार पाचर्णे यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे भाजपच्या वतीने पुन्हा त्यांना उमदेवारी दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरुळी कांचन येथे आलेल्या महाजनादेश यात्रेत केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने माजी आमदार अशोक पवार व माजी जिल्हा परिषद चे अध्यक्ष प्रदीप कंद यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे. अशोक पवार हे प्रत्येक गावात तसेच वाडया वस्तीवर जाऊन विविध मान्यवरांची भेट घेत आहेत. कंद यांनी प्रचाराच्या गाड्या तयार केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण आहे. याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.