अजितदादा कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेणार? ‘बॅगवाल्या’वर कारवाई कधी? रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर, बॅगवाल्या मंत्र्यांवर (शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट) कारवाईची मागणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रोहित पवार यांच्या या ट्विटमुळे महायुती सरकारवर दबाव वाढला असून, मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा जोर धरू लागली आहे.
माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेत अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. रोहित पवार यांनी हा व्हिडीओ X वर शेअर करत कोकाटे यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या असंवेदनशील वक्तव्यांवरही प्रश्न उपस्थित केले.
कोकाटे यांनी, “मी रमी खेळत नव्हतो, फक्त मोबाईलवरील जाहिरात स्कीप करत होतो,” असं स्पष्टीकरण दिलं. मात्र, त्यांच्या या दाव्याला विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी गंभीरपणे घेतलं नाही.
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) चे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर घरात नोटांचे बंडल आणि हॉटेल लिलाव प्रकरणातील गंभीर आरोपांमुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे त्यांना “बॅगवाले मंत्री” असा टोमणा मारला जात आहे. रोहित पवार यांनी या दोन्ही मंत्र्यांच्या वर्तनावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का?
बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 25, 2025
रोहित पवार यांचं ट्विट काय
“पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजितदादा दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का? बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत मा. शिंदे साहेब कधी दाखवणार? या ट्विटमधून रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कठोर भूमिकेचं कौतुक केलं असलं, तरी एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्र्यांवर कारवाई होण्याबाबत शंका व्यक्त केली आहे.




