ठाकरे बंधूंच्या मोर्चात अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Sunil Tatkare | राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाने राजकीय वातावरण तापले आहे. यानंतर आता मराठी भाषेच्या अस्मितेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मैदानात उतरले आहेत. ५ जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघेही उपस्थिती राहणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शुक्रवारी या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला आहे. यानंतर आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मोर्चात सहभागी होणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुनील तटकरे यांनी सांगितले की, ५ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताच नेता सहभागी होणार नाही. हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या संदर्भात काही भावना व्यक्त करायच्या असतील तर आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
ठाकरे बंधूंच्या मोर्चामुळे महायुतीला फटका बसेल का, यावर बोलताना, ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे राजकीयदृष्ट्या बघत नाही. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. ठाकरे बंधुच्या मोर्चाने राज्यात फार मोठा बदल किंवा मराठी मतांचे ध्रुवीकरण होणार नाही, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
निवडणुका महायुती म्हणूनच लढणार
राज्यातील निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचे ठरले आहे. असे असताना कोणाला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते स्वतंत्र आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं आहे, त्या पद्धतीने आम्ही सामोरे जाऊ, असे तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
हेही वाचा:





