Pune District : बेलवाडीच्या गोल रिंगण सोहळ्याने पारणे फेडले

संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण उत्साहात
नीलकंठ मोहिते
इंदापूर – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी, क्षेत्र देहू येथून हरिनाम गात, मजल दर – मजल करत, क्षेत्र पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला जाताना, पालखी सोहळ्यातील पहिले मानाचे गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे भक्ती रसात नाहून, जय घोष करीत, वाटचाल करतात. हीच प्रथा यंदाही पालखी सोहळ्याने जपत, मानाचे दोन अश्व गोल रिंगणात सोडून या अश्वांच्या तीन परिक्रमेने, वारकर्यांनी अनेक सांप्रदायिक खेळ खेळत, पहिले गोल रिंगण उत्साहात पार पडले.
धन्य मी मानिण आपुले संचित
राहिलीसे प्रीत तुझे नामी ।
धन्य जालो आता यासी संदेह नाही
न पडे या वाही काळा हाती।
ब्रम्हरस करू भोजन पंगती
संताचे संगती सर्वकाळ ॥
विठ्ठल नामाचा महिमा गात, निघालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोंल रिंगण टाळकरी, विणेकरी, पताकावाले, पखावजे, तुलसी वृंदावन घेतलेल्या महिला व मानाचे अश्व यांनी सुरू असलेल्या, हरीनामाचा गजरात परिक्रमा पूर्ण करीत गोल रिंगण सोहळ्यात लाखो नयनांचे पारणे फेडले. ज्ञानोबा.. तुकाराम.. ज्ञानोबा.. तुकाराम या हरी गजराने बेलवाडी दुमदुमली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळयांचे सालाबादप्रमाणे, यंदाही सणसर गावच्या हददीतील मुक्काम आटपून सकाळच्या प्रहरात बेलवाडीकडे पालखी सोहळा मार्गस्थ झाला. या पालखी सोहळयांत बेलवाडी गावात पहिले गोल रिंगण असल्याने इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यांतील मोठ्या संख्येने, रिंगण सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक उपस्थित होते. तुकोबारायांचा पालखी रथ रिंगणस्थळी सकाळी 7.40 मिनिटांनी दाखल झाला. गावकर्यांनी पालखी रथातून खांद्यावर घेत, रिंगण स्थळावरील शामियानात जयघोष करीत आणली.
यावेळी राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे तसेच पालखी विश्वस्तांच्या हस्ते रिंगण सोहळ्यात मानांच्या आश्वांचे पूजन पार पडले. तहसीलदार जीवन बनसोडे, अर्जुन देसाई, मयुरी जामदार, शुभम निंबाळकर, व सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व गावकरी उपस्थित होते.
वार्याच्या वेगाने विणेकरी, झेंडेकरी, टाळकरी धावले. माऊली… माऊली असा आवाज आसमंतात पोहचत होता. काही निमिशांचा विलंब न लावता रिंगणातील अश्वांनी परिक्रमा पूर्ण केल्या. फुगड्या पावल्या रंगल्या होत्या. अश्वांच्या दौडीनंतर रिंगण सोहळ्यांची सांगता करण्यांत आली.
पांडुरंगा काहि आईकावी मात!
न करावे मुक्त आता मज !
जन्मांतरे मज तैशी देई देवा !
जेणे चरण सेवा घडे तुझी !
बेलवाडीकरांकडून स्वागत
बेलवाडीकर नेहमी वारकर्यांची सेवा करण्यासाठी आतुर झालेले असतात. त्याच पद्धतीने, आजही आपल्या घरी वारकर्यांना भोजन व इतर सेवा देऊन वारकर्यांचा पाहुणचार न्याहरी दिली. अशीच सेवा जन्मोजन्मी मिळू दे, असे साकडे गावकरी घालताना दिसत होते. दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी गावकर्यानी गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत गावातील मारूत्ती मंदिरात आणली तोफांची सलामी देत गावकर्यांनी स्वागत केले. दुपारची न्याहरी घेऊन पालखी सोहळा लासुर्ण जंक्शन, अंथूर्ण मार्गी निमगाव केतकीकडे मार्गस्थ झाला.





