Delhi Election : निकालांनंतर आप-काॅंग्रेस आघाडी करणार?

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आम आदमी पक्ष आणि काॅंग्रेस यांच्या धुरिणांमध्ये चर्चा सुरु झाली असून आता निकालानंतर तरी इंडिया आघाडीच्या सूत्राप्रमाणे काॅंग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 70 जागांपैकी भाजपचे 43 उमेदवार आघाडीवर होते तर आपचे 23 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेसचा फक्त एक उमेदवार आघाडीवर होता. दिल्लीमध्ये बहुमतासाठी किमान 36 जागा जिंकणे आघाडी किंवा पक्षाला गरजेचे असते.
निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आप आणि काँग्रेसची आघाडी होणार अशी चर्चा सुरू झाली होती. निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर आता आप आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात का, अशीही चर्चा सुरू झाली होती. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार संदीप दिक्षीत यांना याबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की काँग्रेस आणि आपच्या निवडणूक पश्चात आघाडीबद्दल आपल्याला काहीही माहिती नाहीये.
ही आघाडी करायची की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घ्यायचा आहे. दिल्लीच्या सत्तासंघर्षामध्ये प्रमुख लढत ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये दिसून येत होती. एकेकाळी इथे सत्तेत असलेल्या काँग्रेसला या संघर्षात एकही राजकीयतज्ज्ञ स्थान द्यायला तयार नव्हता.
बहुतांश एक्झिट पोलमध्येही भाजप किंवा आप या दोघांनाच पुन्हा संधी असल्याचे दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारादरम्यान, यमुना नदीच्या प्रदूषणावर आणि अरविंद केजरीवाल यांच्या आलिशान निवासस्थानावर जोरदार टीका झाली होती. मोदींनी वापरलेले ‘आपत्ती’ आणि ‘शीशमहाल’ हे शब्द खूपच आक्षेपार्ह ठरले.





