कर्नाटकमध्ये मोठी घडामोड, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या जागी नवा चेहरा येणार? चर्चांना उधाण

बंगळुरू : कर्नाटकमध्ये सप्टेंबरनंतर राजकीय घडामोडी घडतील, असा दावा त्या राज्याचे मंत्री के.एन.राजन्ना यांनी गुरूवारी केला. त्यामुळे कॉंग्रेसशासित कर्नाटकमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस नेतृत्वबदल होईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या जागी नवा चेहरा येईल, असा अंदाज वर्तवणाऱ्या चर्चांना उधाण आले आहे.
कर्नाटक कॉंग्रेसमध्ये विविध मुद्द्यांवरून अस्वस्थता असल्याचे दडून राहिलेले नाही. काही आमदारांनी नुकतीच स्वपक्षाच्याच सरकारच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या कार्यकाळात (वर्ष २०१३-१८) सिद्धरामय्या जसे होते; तसे आता नाहीत, अशी भावनाही त्या आमदारांनी व्यक्त केली.
त्याचा संदर्भ घेऊन पत्रकारांनी राजन्ना यांना प्रश्न विचारले. सिद्धरामय्या यांच्यावर कुठला दबाव आहे का, या प्रश्नाचाही त्यामध्ये समावेश होता. उत्तरादाखल राजन्ना यांनी राजकीय चर्चांना खतपाणी घालणारे संकेत दिले. सिद्धरामय्या यांच्या पहिल्या कार्यकाळात कॉंग्रेसमध्ये एकच सत्ताकेंद्र होते.
मात्र, आता अनेक सत्ताकेंद्रे अस्तित्वात आहेत. सिद्धरामय्या यांना सरकार आणि पक्षाचाही विचार करावा लागतो, असे ते म्हणाले. तसेच, वर्षाच्या अखेरीस राज्याच्या राजकारणात काही घडामोडी घडतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.
राजन्ना यांच्याकडे सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय म्हणून पाहिले जाते. त्यांचे अनेक सत्ताकेंद्रांविषयीचे वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना उद्देशून असल्याचे मानले जात आहे. कर्नाटकात मे २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये बाजी मारत कॉंग्रेसने सत्ता हस्तगत केली.
मात्र, मुख्यमंत्री पदावरून मोठी रस्सीखेच झाल्याने पेच निर्माण झाला. त्यावेळी सिद्धरामय्या यांच्याकडे धुरा सोपवताना अडीच वर्षांनंतर शिवकुमार यांच्याकडे सुत्रे सोपवण्याचा तोडगा कॉंग्रेस नेतृत्वाने काढल्याचे मानले जाते. संबंधित अडीच वर्षांचा कार्यकाळ चालू वर्षाच्या अखेरीस समाप्त होईल. त्यामुळे राजन्ना यांनी केलेल्या वक्तव्याचे महत्व वाढले आहे.





