Mallikarjun Kharge : कर्नाटकमधील नेत्यांना खर्गे यांच्या कानपिचक्या

बंगळुरू : कर्नाटकातील सत्तारूढ कॉंग्रेसमध्ये सत्तासंघर्ष सुरू असल्याचे दडलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्या राज्यातील नेत्यांना कानपिचक्या दिल्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांचा थेट उल्लेख करत त्यांनी एकोप्याने कार्य करण्याचा सल्लाही दिला. कर्नाटकमधील एका प्रकल्पाच्या उद्धाटनासाठी खर्गे, सिद्धरामय्या आणि शिवकुमार एकत्र आले.
त्यावेळी बोलताना खर्गे यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्या कार्याची प्रशंसा केली. तसे करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या सुप्त सत्तासंघर्षावरही बोट ठेवले. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी एकत्रितपणे पुढील वाटचाल करावी. त्यांनी अधिकाधिक फोकस कर्नाटकच्या विकासावर ठेवावा. विकासाकडे दुर्लक्ष करणे जनतेला रूचणार नाही. एकत्रित कार्य केल्यास ते यशस्वी ठरेल.
दोन्ही नेत्यांनी एकाच दिशेने वाटचाल करावी असे आम्हाला वाटते. ते वेगळ्या दिशांनी गेल्यास अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला. कर्नाटक कॉंग्रेसमध्ये सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांचे नेतृत्व मानणारे वेगवेगळे गट असल्याचे मानले जाते. सिद्धरामय्या समर्थकांना ते मुख्यमंत्रिपदी कायम राहावे असे वाटते. तर, शिवकुमार यांना बढती मिळावी अशी त्यांच्या समर्थकांकडून मागणी केली जाते.



